भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी या व्हिडीओवरून जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. तसेच व्यक्तिगत हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे, या प्रकाराचा निषेध करतो, असं आव्हाडांनी म्हटलं. त्यांच्या याच ट्वीटवर त्यांची मुलगी नताशा आव्हाडने प्रतिक्रिया देत सोमय्यांबाबतचा एक अनुभवाला सांगितला.

नताशा आव्हाड म्हणाली, “बाबा,जेव्हा तुम्ही कोविडमध्ये गंभीर आजारी होता, तेव्हा हेच किरीट सोमय्या तुम्ही आजारी नाहीतच, नाटक करत आहात असे खोटे आरोप करत होते. तसेच तुम्ही आजारी असल्याचा पुरावा मागत होते. तेव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीट सोमय्यांच्या खासगी आयुष्याच्या हक्कांसाठी तुम्ही उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे.”

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तिक हल्ले करून एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे या प्रकाराचा मी निषेध करतो. जेव्हा त्याचं वैयक्तिक जीवन तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू असला तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तिकरीत्या त्याच्यावर हल्ला करून त्याचे वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.”

“एका व्यक्तीबद्दल जे फिरतंय त्यावर लोक टाळ्या देत आहेत”

“त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक त्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उद्ध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, ३०-४० वर्षे देऊन या स्तरावर आलेला असताना एखाद्याला ५ मिनिटांत उद्ध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शरद पवारांकडे भाजपाच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो”

“मी १९९५ मध्ये शरद पवारांकडे भाजपाच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवारांना मी सांगितले की, या सातबाऱ्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. शरद पवारांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला. ते मला म्हणाले की, जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, एखादा नेता वैयक्तिक जीवनामध्ये काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही,” असंही जितेंद्र आव्हाडांनी नमूद केलं.