राज्यातील दोन केंद्रांवर रविवारी होणार असलेली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा रद्द झाल्याची माहिती अनेक विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचल्याने राज्याच्या दूरदूरच्या भागांमधून परीक्षेसाठी आलेल्या या विद्यार्थ्यांची निराशा झाली.
देशभरातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा दरवर्षी आयोजित करण्यात येते. यातून निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. देशभरातील ४ हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात आणि ती उत्तीर्ण होणाऱ्या गुणानुक्रमे १ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ही परीक्षा देणाऱ्या राज्यनिहाय विद्यार्थ्यांचा कोटा ठरवून देण्यात आला असून, त्यापैकी महाराष्ट्राच्या वाटय़ाला ५०० जागा आहेत.
या परीक्षेच्या लेखी परीक्षेचा दुसरा टप्पा रविवारी होणार होता. राज्यात या परीक्षेची केंद्रे फक्त मुंबई व पुणे येथे होती. परीक्षार्थी मुले राज्याच्या वेगवेगळ्या भागातून एक दिवस आधीच मुंबई किंवा पुण्यासाठी रवाना झाली. दरम्यान, आदल्या दिवशी, म्हणजे शनिवारी ही परीक्षा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र प्रवासात असलेल्या विद्यार्थ्यांना त्याची माहिती न मिळाल्याने ते मुंबई/पुण्यात येऊन पोहचले. रविवारी ते परीक्षा केंद्रांवर गेले, तेव्हा परीक्षा रद्द झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे या विद्यार्थ्यांची निराशा झाली. शिवाय नेमके काय झाले हे कळत नसल्याने परीक्षा केंद्रांवर दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. परीक्षा रद्द झाल्याची माहिती ‘एनटीएसई’च्या संकेतस्थळावर टाकण्यात आली असली, तरी संकेतस्थळ उघडत नसल्याने गोंधळात आणखी भर पडली.
पंजाबमधील गोंधळाचे कारण
पंजाब राज्यासाठी ९० विद्यार्थ्यांचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. यापैकी ५० मुले एकाच परीक्षा केंद्राच्या दोन वर्गामधून निवडली गेल्याचे लक्षात आले. सकृतदर्शनी यात गैरप्रकार झाल्याचा संशय आल्यामुळे तेथील एका वकिलाने याचिकेद्वारे न्यायालयात दाद मागितली. पंजाब उच्च न्यायालयाने या याचिकेची सुनावणी केल्यानंतर रविवारी होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला स्थगिती दिली.