मुंबई : उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी व आत्महत्येच्या रोखण्यासाठी सुरू केलेल्या ‘राष्ट्रीय कृती दला’ने सुरू केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वाढता ताण व आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील मानसिक ताण कमी करण्यासाठी व आत्महत्या प्रतिबंधासाठी योग्य उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

देशातील उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी तसेच आत्महत्या रोखण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी, त्यासंदर्भातील माहिती संकलित करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांकडून मते मागविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ८ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कृती दलाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले. शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या या संकेतस्थळामार्फत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न, शैक्षणिक संस्थांमधील आत्महत्या प्रतिबंध व त्यासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर चर्चा व विचारमंथन करण्यात येते. या संकेतस्थळाच्या माध्यमातून उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राध्यापक, मनोविकारतज्ज्ञ, संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकडून अभिप्राय संकलित करण्यात येतो. तसेच विद्यार्थ्यांचा मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, माध्यम क्षेत्रातील व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही मते मागवून त्यावर चर्चा व विचारमंथन करून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील मानसिक ताण व त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

उच्च शिक्षण संस्थांकडून माहिती संकलित करण्यासाठी संस्थात्मक सर्वेक्षणही करण्यात येते. राष्ट्रीय कृती दलाच्या सर्वेक्षणाला उच्च शिक्षण संस्था व त्यांच्या विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने आता राष्ट्रीय कृती दलाच्या सर्वेक्षणामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचे सखोल आकलन करून त्यावर परिणामकारक उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांना राष्ट्रीय कृती दलाच्या https://ntf.education.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन सर्वेक्षणामध्ये सहभागी हाेण्याची सूचना दिली आहेत. तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांपर्यंत संकेतस्थळ व सर्वेक्षणाबाबत अधिकाधिक माहिती पाेहचवून त्यांचा सहभाग वाढविण्यार भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हिंदी व इंग्रजीमध्ये सर्वेक्षण

राष्ट्रीय कृती दल या संकेतस्थळावर करण्यात येणारे सर्वेक्षण हे इंग्रजी व हिंदी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. सर्वेक्षण पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून त्यात कॅम्पसचे वातावरण, समावेशकता आणि आत्मीयता, ताणतणावाची कारणे, भेदभाव, विद्यार्थ्यांसाठी सहाय्य व्यवस्था व तक्रार निवारण प्रणाली, तसेच विद्यार्थी कल्याणासाठी उपाययोजना या विषयांचा समावेश आहे.