मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या, शनिवारी रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. गेल्या २४ वर्षांत राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी प्रभावी पक्ष ठरला असला तरी पुढील वर्षांत पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान नेतृत्वासमोर असेल.

रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करताना पक्षाच्या वतीने शुक्रवारी नगरमध्ये मोठा मेळावा आयोजित केला होता. पण वेधशाळेने वादळी पावसाचा अंदाज वर्तविल्याने ही सभा लांबणीवर टाकण्यात आली. वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

रौप्यमहोत्सवी वर्षांतच राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान असेल. पक्षाचा अलीकडेच राष्ट्रीय दर्जा रद्द झाला. पक्षाचे नेते पक्षांतर करणार असल्याच्या वावडय़ा सतत उठत असतात. पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची केलेली घोषणा व त्यानंतर तीन दिवसांत माघार घेण्याचे जाहीर केले असले तरी त्यातून पक्षात सारे काही आलबेल नाही हाच संदेश गेला. अजित पवार यांचे बंड एकदा फसले असले तरी त्यांच्याबाबतही सातत्याने संशय व्यक्त केला जातो. यामुळेच २५ व्या वर्षांत पदार्पण करीत असताना पक्षाला एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्यापुढे असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षाची भावी वाटचाल महत्त्वाची -सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५ वर्षांचा होत असून यापुढील वाटचाल अतिशय महत्त्वाची राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. केंद्रातील सरकार एका धर्माच्या खुंटीला देश बांधायला निघाले आहे. अशा वेळी ठामपणे उभे राहण्याची भूमिका राष्ट्रवादीला पार पाडावी लागणार आहे. म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्थानिक गटबाजीत गुंतून न पडता व्यापक सामाजिक काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुळे यांनी केले.