scorecardresearch

ED Arrests Nawab Malik : फडणवीसांवर केलेले आरोप मलिकांना भोवले

मलिक यांच्या विरोधात फडणवीस यांनी आरोप केल्यावर सारी कागदपत्रे केद्रीय यंत्रणांकडे सुपूर्द केली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांची पत्नी अमृता यांना वादात ओढण्याचा केलेला प्रयत्न मलिकांना त्रासदायक ठरला आहे.

नवाब मलिक यांच्या जावयाला गेल्या वर्षी अमली पदार्थाच्या व्यवहारात अटक झाली होती. शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला झालेल्या अटकेनंतर मलिक यांनी अमली पदार्थविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांच्या मालिकेतच मलिक यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना वादात ओढले होते.  यावर मलिक यांच्या विरोधात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा देत फडणवीस यांनी मलिक यांचे गुन्हेगारी विश्वासी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर फडणवीस यांच्या विरोधातही मलिक यांनी आरोप केले होते.

मलिक यांच्या विरोधात फडणवीस यांनी आरोप केल्यावर सारी कागदपत्रे केद्रीय यंत्रणांकडे सुपूर्द केली होती. फडणवीस यांच्या तक्रारीवरूनच सक्तवसुली संचालनालय, राष्ट्रीय तपास यंत्रणेने मलिक यांच्या विरोधात चौकशी सुरू केली होती. त्यातूनच मलिक हे अडचणीत आले. मलिक यांनी फडणवीस यांना तेव्हा वादात ओढल्याबद्दल राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नापसंती व्यक्त केली होती. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळेच मलिक हे अडकले आहेत.

कारवाई योग्यच -फडणवीस

नागपूर : दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांमध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा  सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेली ईडीची कारवाई योग्यच आहे, असे मत विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

दहशतवाद्यांच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली असून ही गंभीर बाब आहे त्यामुळे यावर राजकारण करु नये.  जमीन मालकांनी आम्हाला एकही पैसा मिळाला नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. केवळ अतिक्रमण काढण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी बदलून व्यवहार करण्यात आला.   दाऊदची बहीण हसीना पारकरशी व्यवहार झाले आहेत.  या व्यवहारानंतर मुंबईत तीन वेळा हल्ले झाले, याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले.  

गोंदियाचे दुसरे पालकमंत्रीही  कोठडीत

महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर एक वर्षांच्या काळातच गोंदिया जिल्ह्याच्या दोन्ही पालकमंत्र्यांना ईडी कोठडीत जावे लागले. आज ईडी कोठडी सुनावण्यात आलेले नवाब मलिक गोंदियाचे पालकमंत्री होते. त्यापूर्वीचे पालकमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडी कोठडीतच आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nawab malik on ed radar after making allegations on devendra fadnavis zws

ताज्या बातम्या