राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. ते अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबतही करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच याबाबत माझ्याकडे पुरावे देखील असल्याचं त्यांनी नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवाब मलिक म्हणाले, “दोन महिने झाले, आर्यन खान प्रकरणात आम्ही चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर पाळत ठेवली जात आहे. याबाबत एकाचा पाठलाग आमच्या हितचिंतकांनी केला. त्यावेळी ते पळाले. या संशयितांची माहिती ट्विटरवर अनेकांनी दिलीय. या लोकांचं ट्विटर हँडल पाहिलं असता ते भाजपाशी संबंधित असल्याचं दिसत आहे.”

“अनिल देशमुख यांचहाबरोबर जसा खेळ झाला तसंच सुरू झालं आहे. याबाबत माझ्याकडे महिती आली आहे. याबाबत माहिती पोलिसांना देण्यात येईल,” असंही ते म्हणाले.

“केंद्रीय यंत्रणा राज्यातील एका मंत्र्याला खोट्या प्रकरणात अडकावण्याचा प्रयत्न”

“जर केंद्रीय यंत्रणेचा वापर करत मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, घाबरवलं जात असेल तर हे सहन करणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट आहेत. याबाबत मी अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे,” असंही मलिकांनी नमूद केलं.

नवाब मलिक म्हणाले, “अनिल देशमुख यांच्याविरोधात ज्या पद्धतीने खोटी तक्रार करून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली, तसंच माझ्याबाबत केलं जातंय. माझ्या हाती याविषयी पुरावे लागले आहेत. केंद्रीय यंत्रणांचे काही अधिकारी स्वतः लोकांना माझ्याविरोधात मसुदा तयार करून पाठवत आहेत. त्यांना ईमेल आयडी देत आहेत. त्यांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. याचे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”

“केंद्रीय यंत्रणा राज्यात एका मंत्र्याला अडकवण्याचा डाव करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते खरे पुरावे आहेत. अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप चॅटही मला मिळाल्यात. मी अमित शाह यांनाही तक्रार करणार आहे. त्यांचे अधिकारी असं काम करत असतील तर ते काय कारवाई करतात हे आम्ही बघू,” असं मलिकांनी सांगितलं.

“माझ्या नातवांच्या शाळेचीही माहिती काढली जातेय”

नवाब मलिक म्हणाले, “काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची, कार्यालयाची आणि माझे लहान नातू कोणत्या शाळेत जातात याची माहिती काढत असल्याचं मला कळालं. मागच्या आठवड्यात मी दुबईत असताना दोन जण कॅमेरा घेऊन माझ्या घराचे फोटो काढत होते. तेव्हा घराच्या परिसरातील लोकांनीच त्यांना अडवलं. त्यानंतर ते पळू लागले. त्यांना टिळक टर्मिनस येथे पकडण्यात आलं.”

“मी ट्विटरवर या लोकांचे फोटो टाकले त्यानंतर या २ पैकी एकाची माहिती समोर आली आहे. ही एक व्यक्ती मागील २ महिन्यापासून राज्यात जे सुरू होतं त्यावरून माझ्या विरोधात ट्वीट करत होता. त्याचं नावही समोर आलंय. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार देणार आहे. मी जेव्हा कुठं कागदपत्रे काढायला जातो किंवा कोणत्याही विभागात तक्रार करायला जातो तेथे ठिकठिकाणी यातील एक व्यक्ती दिसून आला आहे. त्यांना नेमकं काय करायचं आहे?”

हेही वाचा : नवाब मलिक यांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करून म्हणाले…!

दरम्यान, नवाब मलिक म्हणाले होते, “या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik say will write complaint to amit shah about central agencies pbs
First published on: 27-11-2021 at 10:16 IST