आर्यन खान आणि त्याच्या मित्रांना अटक झालेल्या क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्हं उपस्थित केली आहेत. या रेव्ह पार्टीच्या आयोजनाची माहिती होती तर मुख्य आयोजकाशी वानखेडेंचे काय संबंध आहेत, असा प्रश्न मलिक यांनी विचारलाय.
क्रुझवर रेव्ह पार्टी होणार होती असा दावा एनसीबीने केला होता. त्या रेव्ह पार्टीमध्ये फॅशन टिव्ही आयोजक होती आणि त्याचा हेड काशिफ खान होता त्यामुळे काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे? आजपर्यंत त्या दाढीवाल्यावर कुठलीही कारवाई का नाही?, याची उत्तरं समीर वानखेडे यांच्याकडून अपेक्षित आहेत, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
त्या क्रुझ ड्रग्ज पार्टीत दाढीवाला असताना एनसीबीच्या नजरेतून का सुटला? की एनसीबी अधिकार्याची विशेषतः समीर वानखेडे यांनी मेहेरनजर का दाखवली?, असे सवालही नवाब मलिक यांनी केले आहेत.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीला कोणतीही परवानगी नव्हती. फॅशन टिव्हीचा दाढीवाला हा व्यक्ती होता. विनापरवाना ड्रग्ज पार्टी झाली तर ते क्रूझ का सोडले? क्रुझवरील १३०० लोकांची चौकशी का केली नाही? क्रूझवर अशी पार्टी झाली तर त्या सर्व लोकांना ताब्यात का घेतले नाही? असे सवाल मलिक यांनी केले आहेत.
इतकच नाही तर हे सर्व प्रकरण हे आयोजकाशी संबंधित असून आयोजक हा समीर वानखेडे याचा मित्र आहे, असा दावाही मलिक यांनी केलाय. याच कारणामुळे जाणुनबुजुन आयोजकाला बाजूला करण्यात आले आणि १३ लोकांना टार्गेट करण्यात आले, असं मलिक म्हणाले आहेत. तसेच आतापर्यंत या सर्व प्रकरणाची चौकशी का गेली नाही?, असा प्रश्नही मलिक यांनी विचारलाय.