आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. त्यांच्या विरोधात चार तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वानखेडे यांनी आज उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयने करावा आणि कठोर करवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने यासंदर्भात वानखेडेंना काहीसा दिलासा देणार निर्णय घेतलाय. न्यायालयाने समीन वानखेडे यांना अटक करताना ३ दिवसाआधी नोटीस देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. मात्र वानखेडे यांनी केलेल्या या अर्जावरुन त्यांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी निशाणा साधलाय.

तपास करणारा अधिकारीच कोर्टात गेलाय…
आर्यन खान प्रकरणात तपास करणारा अधिकारीच आज न्यायालयात गेलेला असा उल्लेख करत नवाब मलिक यांनी वानखेडे यांनी फर्जीवाडा केल्याचा उल्लेख पुन्हा एकदा केलाय. “या प्रकरणात तपास करणारा अधिकारीच आज कोर्टात गेला होता. मुंबई पोलिसांकडे तपास देऊ नये अशी त्यांची मागणी होती. कोर्टाने भूमिका घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी सांगितलं की यांना आम्हाला अटक करायची असेल तर ७२ तास आधी आम्ही यांना नोटीस देऊ. कालपर्यंत पोलीसांकडे गेले मला अटक करु नका म्हणाले. आज आता मग हायकोर्टात धाव घेतायत, असं म्हणत नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या या अर्जावरुन टीका केली.

एका आठवड्यात असं काय झालं की…?
पुढे बोलताना, “एक आठवड्याभरापूर्वी ते मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागत होते आणि आज मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. एका आठवड्यात असं काय घडलं?,” असा प्रश्नही नवाब मलिक यांनी विचारला आहे. “निश्चितरुपाने यांनी काही फर्जवाडा केलाय. त्यामुळे हा अधिकारी घाबरतोय आणि हीच सत्य परिस्थिती आहे,” असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

ट्विटरवरुन फिल्मी स्टाइल इशारा…
आर्यनला जामीन मिळल्यानंतर फिल्मी स्टाइलमध्ये ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिलीय. पाचच्या सुमारास आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर मलिक यांनी ५ वाजून १४ मिनिटांनी, “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” असं ट्विट केलं आहे.

वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केलाय. समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असून आपण न्यायालयात उत्तर देऊन असं म्हटलं आहे. मात्र असं असतानाच आता या प्रकरणावरुन आमने-सामने आलेले वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यामध्ये मागील दोन ते तीन आठवड्यांपासून रोज आरोप प्रत्यारोप होतानाचे चित्र दिसत आहे. त्यातच आज आर्यनला जामीन मिळाल्यानंतर मलिक यांनी केलेल्या ट्विटमधून यापुढेही ते वानखेडेंविरोधातील भूमिका काय ठेवणार असल्याचं स्पष्ट होतं आहे. आधीच त्यांनी आपण वानखेडेंसंदर्भातील बरीच कागदपत्रं वेळोवेळी पुढे आणणार असल्याचं म्हटलं आहे.