गेल्या वर्षभरात मुंबईत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्जसंदर्भात दोन मोठ्या कारवाया केल्या. ज्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन यांचा समावेश आहे. मात्र, या दोन्ही प्रकरणात एनसीबी आर्यन किंवा रियाजवळून जप्त केलेले ड्रग्ज दाखवू शकली नाही, किंवा त्यांनी ड्रग्जचे सेवन केले आहे की नाही, हे तपाण्यासाठी त्या दोघांच्या रक्ताच्या चाचण्याही केल्या नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये, एनसीबीने दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आणि डिलीट केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्ससह मोबाईलमधील मेसेजेसचा वापर करून त्यांना अटक केली.

रिया चक्रवर्ती प्रकरण..

एनसीबीने गेल्या वर्षी चक्रवर्तीला निव्वळ तिच्या फोनवर सापडलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे अटक केली होती. ड्रग्जबद्दलची ही माहिती एनसीबीला ईडीने दिली होती. ईडी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत होती. यावेळी रिया चक्रवर्तीसह सुशांतशी संबंधित आणखी काही जणांची चौकशी करण्यात आली होती. रिया चक्रवर्तीच्या फोनमधील काही चॅट्स सुशांतसाठी अंमली पदार्थ खरेदी करण्याशी संबंधित आहेत. त्यानुसार एफआयआर नोंदवून तिला अटक केली आहे, असं एनसीबीने रियाच्या अटकेनंतर म्हटलं होतं. नंतर एनसीबीने सांगितले की, रियाने ड्रग्ज खरेदी करण्यासाठी केलेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावे सापडले असून ते व्हॉट्सअप चॅटमधील गोष्टी खऱ्या असल्याची पुष्टी करतात.

दरम्यान, ऑक्टोबर २०२० मध्ये चक्रवर्तीला जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं, की “रिया ड्रग्ज विक्रेत्यांच्या साखळीचा भाग नाही आणि तिने स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या आर्थिक फायद्यासाठी ड्रग्ज खरेदी केलेले नाहीत, तसेच इतर कुणालाही विकले नाहीत.”

आर्यन खान प्रकरण..

या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत क्रूझवर छापा टाकल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या आर्यन खान प्रकरणात, एनसीबीने अरबाज मर्चंट जवळून ६ ग्रॅम चरस सापडल्याचा दावा केला होता. त्यानंतर एनसीबीने आर्यन आणि  मोबाईल ताब्यात घेतला आणि सांगितले की हे दोघंही ड्रग्ज घेतात, असे पुरावे त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये आढळले आहेत. मर्चंटचे वकील तारक सय्यद यांनी युक्तिवाद केला की चॅटमधून काहीच स्पष्ट सिद्ध झालेले नाही. कारण आपण जो मेसेज करतोय, त्याचा तोच अर्थ होतो, किंवा मेसेजप्रमाणेच कृत्य केलंय असा त्याचा अर्थ निघत नाही.

याबद्दल बोलताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग (एएसजी) म्हणाले की, चॅट्समध्ये मोठ्या प्रमाणावर हार्ड ड्रग्स बद्दल चर्चा होती आणि ती केवळ वैयक्तिक वापरासाठी नाही, असा त्यांनी युक्तिवाद केला. या चॅट्स एनसीबीने न्यायालयात सादर केल्या आहेत, परंतु त्यांची माहिती सार्वजनिक केली गेली नाही. आर्यन खानचे वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, कोणत्याही चॅट्समध्ये क्रूझवरील पार्टीबद्दल चर्चा नाही.