राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२१ मधील एका भेटीचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. भाजपा-शिवसेना युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं मत बदललं होतं आणि ते परत भाजपाबरोबर येण्यास तयार होते, असा दावा अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांनी केला. मात्र, ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी हा दावा फेटाळला आहे. तसेच तटकरे खोटं बोलत असल्याचा आरोप केला.

सुनील तटकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी २०२१ मध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर माझी संजय राऊतांबरोबर बैठक झाली तेव्हा मला कळलं की, दिल्लीतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींबरोबर एकांतात चर्चा झाली.”

“उद्धव ठाकरे पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा विचार करत होते”

“माझी संजय राऊत यांच्याबरोबर बैठक झाली तेव्हा तेथे एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही हजर होते. त्यावेळी संजय राऊतांनी मला सांगितलं की, मोदींबरोबरच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे आपलं मत बदलण्याची शक्यता होती आणि ते पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा विचार करत होते,” असंही सुनील तटकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “बंडखोर आमदारांना तत्काळ अपात्र करा”, शरद पवार गटाच्या मागणीवर सुनील तटकरे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राऊतांनी आमच्यावर टीका करताना विचार करून भाषा वापरावी”

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही बैठक दिल्ली भेटीनंतर १५ दिवसांनी झाल्याचंही तटकरेंनी नमूद केलं. तसेच संजय राऊतांनी आमच्यावर टीका करावी, मात्र भाषा विचार करून वापरावी, असा इशारा दिला. राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर अनावश्यक टीका करण्याची गरज नाही, असंही तटकरेंनी म्हटलं.