मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यावर बंदी आणा अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेत ही मागणी केली. भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याची परवानगी मागताना आयुक्तांसमोर मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मंगलप्रभात लोढा आणि अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने ही भेट घेतली होती. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

अजानचा भोंगा दिवसातून पाच वेळा वाजतो – प्रसाद लाड

“अजानचा भोंगा दिवसातून पाच वेळा वाजतो. त्याला भाजपाचा विरोध आहे. आम्हीं धर्माला विरोध करत नाहीय पण धर्माच्या माध्यमातून ज्या पद्धतीने धर्म बळकावण्याचं काम करत आहेत त्याला आमचा विरोध आहे,” असं प्रसाद लाड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

“त्या काळात लोकांकडे घड्याळं नव्हती म्हणून दिवसातून पाच वेळा अजान घेत होते, पण सध्या सगळीकडे घड्याळं आहेत. सरकारमध्ये देखील घड्याळ आहे. मोबाइलमध्ये घड्याळ आहे,” असंही त्यांनी म्हटलं.

अजित पवारांची प्रतिक्रिया –

अजित पवारांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजपाच्या मागणीसंबंधी विचारण्यात आलं असता अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा केली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

“कुणी कुठला मुद्दा घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार कुठलंही असो सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जे सांगेल त्याची अंमलबजावणी सरकारला करावी लागते आणि मुद्दा पटला नाही तर अपीलही करावे लागते. कोर्टाने काय निर्णय दिला आहे तो वाचला नाही मात्र त्याची माहिती घेऊन कोर्टाचा अवमान होणार नाही असा निर्णय घेतला जाईल,” असंही अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जातीय सलोखा राहण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केला पाहिजे. पक्षाच्या नेत्यांनीही तीच भूमिका मांडण्याचं काम केलं पाहिजे. यंदाच्या १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज ७५ वर्ष पूर्ण होत असताना जग कुठला विचार करतंय आणि आपण कुठल्या विषयांमध्ये जनतेला गुंतवून ठेवतोय आणि कुठल्या विषयाला महत्त्व देतोय याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन झालं पाहिजे,” असा सल्ला अजित पवारांनी दिला. जनतेनेही या विषयाचा फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असं मतही त्यांनी मांडलं.