मुंबई : नागालँडमधील सर्व सातही आमदारांनी तेथील सत्ताधारी ‘एनडीपीपी’ पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा मिळविण्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता. दोन वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला होता. पक्षात फूट पडल्यावर अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला.
महाराष्ट्रापाठोपाठ नागालँडमध्ये पक्षाच्या आमदारांचे संख्याबळ चांगले होते. एकत्रित राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या सातही आमदारांनी पक्षातील फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली होती. पण सातही आमदारांनी दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी ‘एनडीपीपी’ पक्षात प्रवेश केला. यामुळे त्या राज्यातील पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
राष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक असलेले निकष :
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चार राज्यांमध्ये वैध मतांच्या किमान सहा टक्के मते
- चार राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा
- तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा जिंकणे आवश्यक