टोलच्या मुद्दय़ावरून राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असतानाच, मनसेच्या विरोधात कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा संदेश बाहेर गेला असला तरी राज अधिकाधिक लोकप्रिय व्हावेत, असाच सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. २००९ च्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी हाच प्रयोग केला होता व तो यशस्वी ठरला होता. त्याचीच पुनरावृत्ती व्हावी, असा राष्ट्रवादीचा जाणिवपूर्वक प्रयत्न आहे.  राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक पार पडली. सरकार काहीच कारवाई करीत नाही हा संदेश बाहेर जात आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडून एका सुरात कारवाई केली जाईल, असे सांगितले जाते. पण कारवाई काहीच होत नाही, असा मुद्दा नारायण राणे यांनी बैठकीत उपस्थित केला. राज ठाकरे यांच्याबाबत सरकारने मवाळ भूमिका घेतली जावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.  २००९च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या झंझावताचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला होता. हाच प्रयोग पुन्हा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. राज ठाकरे जेवढे लोकप्रिय होतील त्याचे अधिक नुकसान शिवसेना-भाजपचे होणार आहे. भाजप-शिवसेनेला शह देण्याकरिताच राज ठाकरे यांचा उपयोग करून घेण्यावर यातूनच सत्ताधाऱ्यांनी भर दिला आहे. राज ठाकरे यांच्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक परिसरात राजकीय लाभ होऊ शकतो, असा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गणित आहे.