गुजरातमधील कुख्यात ‘गॉडमदर’ संतोकबेन जडेजा हिच्या मुलासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. मात्र यंदा या पक्षाची सदस्यसंख्या एकने कमी झाली आहे.
गुजरात निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडी करीत नऊ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. उमरेथमधून विद्यमान आमदार जयंत पटेल आणि पोरबंदरमधून कांदेल जडेजा हे दोन उमेदवार निवडून आले. ‘गॉडमदर’ संतोकबेन जडेजा हिचा मुलगा कांदेल निवडून आला आहे. त्याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न आदी १५ गुन्हे दाखल आहेत. गुंडाला उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादीवर टीकाही झाली होती. पण जडेजा १८ हजार मतांनी विजयी झाले.
* गुजरात निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर मोदी यांचे जन्मगाव वडानगरमध्येही उत्साहाचा माहोल आहे. मुस्लीमबहुल वस्तीतील मोदी यांच्या घरातच नव्हे तर अख्ख्या गावभर विजयाचा जल्लोष आहे. मोदी या देशाचे वडाप्रधान अर्थात पंतप्रधान बनावेत, अशीच इच्छा गावकरी बोलून दाखवत आहेत. मोदी गुजरातप्रमाणेच देशाचाही विकास करतील, असे गावकऱ्यांना वाटते.
* आपल्या मुलाच्या विजयाचा आईला अपार आनंद झाला आहे. मोदींच्या विजयानंतर त्यांच्या आईला पत्रकारांनी व दूरचित्रवाहिन्यांनी घेरले तेव्हा त्या म्हणाल्या की, तो या देशाचा पंतप्रधान बनेल, याची मला खात्री आहे. तो गुजरातचा सुपुत्र आहे त्यामुळे गुजरात त्याच्या पाठिशी कायम राहील.
* गुजरातचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर व ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत बाजी मारल्याच्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
* तुमची स्वप्ने पूर्ण होईपर्यंत मी थकणार नाही की थांबणारही नाही, असे आश्वासन विजयानंतर मोदी यांनी गुजरातच्या जनतेला दिले.
* गुजरातची सत्ता काबीज केल्यानंतर मोदी यांनी विजयी मेळाव्यात केलेल्या भाषणात हा विजय भाजपचा आहे, असे सांगत पक्षाला मोठेपणा देण्याचाही प्रयत्न केला. मोदी हे पक्षाला जुमानत नाहीत, असा आरोप त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही करीत असतात. त्यामुळेच मोदी यांनी जाणीवपूर्वक पक्षाने गेल्या चार दशकांत राज्यात घेतलेले श्रमच सफल होत असल्याचे नमूद केले.