सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी गेल्या काही वर्षांत केलेले ‘उद्योग’ सर्वानाच माहित आहेत, लोकलेखा समितीने त्यातील थोडासाच भ्रष्टाचार बाहेर आणला तर एवढय़ा मिरच्या झोंबल्या. मग अशी कामे करायचीच कशाला, असा सवाल करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारला बदनाम करणारे भुजबळ हेच झारीतील शुक्राचार्य आहेत, असा घरचा आहेर राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी दिला.  दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मलबार हिल येथील हायमाऊंट विश्रामगृह, अंधेरी येथील आरटीओ कार्यालयाच्या उभारणीत हजारो कोटींचा घोटाळा झाला असून ठेकेदाराच्या हितासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियम पायदळी तुडविल्याचा ठपका लोकलेखा समितीने ठेवला होता.