राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आग्रह

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच लढवावी, अशी गळ पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत घातली. पवार रिंगणात असल्यास आपण पोटनिवडणूक लढणार नाही, असे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर केल्याच्या पाश्र्वभूमीवर उदयनराजे यांची कोंडी करण्याची खेळी राष्ट्रनादीने केली आहे.

विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्याबरोबरच सातारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्याकरिता पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. जयंत पाटील, अजित पवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. सातारा मतदारंसघातून शरद पवार यांनीच पोटनिवडणूक लढवावी, अशी मागणी सर्वच नेत्यांनी एकमुखी केल्याचे पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यावर विचार करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना पोटनिवडणुकीत पराभूत करण्याची राष्ट्रवादीची व्यूहरचना आहे. उदयनराजे यांच्याशी सामना करण्याकरिता राष्ट्रवादीने ही जागा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शविली. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी पोटनिवडणूक लढण्यास नकार दिला. चव्हाण यांनी शरद पवार यांनीच पोटनिवडणूक लढवावी, अशी जाहीरपणे मागणी केली. त्यावरून पवार हे उमेदवार असल्यास आपण लढणार नाही, असे विधान उदयनराजे यांनी केले होते.