ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या सीओडींनी फोन केल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; फडणवीस आणि दरेकरांकडून पोलिसांची खरडपट्टी

“देशामध्ये सात कंपन्यांना देशांतर्गंत वाटप आणि विक्रीची परवानगी मिळाली आहे. दोन कंपन्यांना पदरेशात विक्रीची परवानगी आहे. त्याउलट १७ कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध असून राज्य सरकारकडे विक्रीची परवानगी मागत आहेत. ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न न औषध मंत्री शिंगणे आणि प्रवीण दरेकर यांना भेटले. माझ्याकडे साठा आहे, परवानगी दिली तर हा साठा देऊ शकतो अशी माहिती दिली. पोलिसांना निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती,” असं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.

“मंत्र्यांच्या ओएसडीने दुपारी फोन करून धमकी दिली अन् त्यानंतर….,” फडणवीसांचा गंभीर आरोप

“देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वणज रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? राज्यात कुठेतरी भाजपाची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.

“पोलीस यंत्रणा काळा बाजार रोखण्यासाठी, जनतेसाठी काम करत आहे. पण डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजपा का घाबरते? सगळा भाजपा वकिलीसाठी का जात आहे? फडणवीस वकील आहेत…ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की त्यांचे संबंध आहेत म्हणून मांडत होते? जर महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस यंत्रणा, एफडीए काम करत असेल आणि चौकशीसाठी बोलावलं असेल तर भाजपाचे प्रमुख नेते तिकडे जातात यावरुन काय संबंध आहेत हा खुलासा केला पाहिजे,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

“ट्विट करुन ५० हजारांचा साठा आम्ही वाटणार आहे सांगता. पण सरकार मागतं तेव्हा ते लोक देत नाही, मग त्यांच्या मागे काय राजकारण आहे हे भाजपाने स्पष्ट केलं पाहिजे. ज्यांनी साठा ठेवला त्यांना चौकशीसाठी बोलावलं आणि नंतर भाजपा नेते वकिलीसाठी पोलीस ठाण्यात जातात हे योग्य नाही…हे त्यांना शोभत नाही. विरोधी पक्षनेता फोनवरुन माहिती घेऊ शकतो, वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते. पोलीस ठाण्यात जाऊन वकिली करणं काय राजकारण आहे माहिती नाही,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

नेमकं काय झालं –
मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब विचारला. यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले. यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले असता तेथील चर्चेनंतर अधिकाऱ्याला सोडण्यात आलं.

दरम्यान कारवाईवर प्रश्चचिन्ह उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या ओएसडीने दुपारी फोन करून धमकी दिल्यानंतर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे. पोलीस आयुक्तालयाबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला.

“एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलिस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. पोलिस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab malik bjp devendra fadanvis bruk pharma company mumbai police sgy
First published on: 18-04-2021 at 10:53 IST