भाजप आणि राष्ट्रवादीतील वाढती जवळीक हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला असला तरी वाढत्या महागाईच्या मुद्दय़ावर सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ठिकठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले. सरकारच्या वर्षपूर्तीपर्यंत दररोज राज्यात ठिकठिकाणी थाळीनाद व हल्लाबोल करण्यात येणार आहे.

केंद्रात शरद पवार कृषीमंत्रीपदी असताना वाढत्या महागाईच्या मुद्दय़ावर राज्यात भाजपच्या वतीने आंदोलन केले जात असे. आता भाजपचे केंद्र व राज्यात सरकार असताना वाढत्या महागाईच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात खासदार सुप्रिया सुळे तर मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनाील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली महागाईच्या निषेधार्थ थाळीनाद आंदोलन करण्यात आले. पुण्यात काही काळ सोलापूर रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपबाबत दिल्लीत मवाळ भूमिका घेतली असली तरी राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने नेहमीच भूमिका घेतली आहे. दुष्काळी परिस्थिती, शेतीचे प्रश्न आदी मुद्दय़ांवरून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करण्याची संधी सोडलेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाच्या बाहेर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर, महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. थाळीनाद करीत रेल्वे स्थानक ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला होता. सणासुदीच्या तोंडावर डाळी व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. किंमती गगनाला भिडल्यावर सरकारने साठेबाजांवर छापे घातले. ही कारवाई आधीच केली असती तरी भाव वाढले नसते, अशी टीका तटकरे यांनी केली.