राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मेल पाठवण्यात आला असून तूर्तास चौकशीची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. दुपारी एक वाजता शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. शरद पवार यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून मेल करत आपण ईडीच्या कार्यालयात येत असल्याचं सांगितलं होतं. या मेलला ईडीने उत्तर दिलं असून तूर्तास चौकशीची गरज नसल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीने शरद पवार यांना सध्या तुमच्या चौकशीची गरज नसून येण्याची काही गरज नसल्याचं सांगितलं आहे. तसंच भविष्यात गरज लागेल तेव्हा तुम्हाला आम्ही नोटीस किंवा समन्स पाठवू त्यांनतर तुम्ही येऊ शकता असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील ईडीकडून मेल आला असल्याचं दुजोरा दिला आहे. मात्र तरीही शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यासाठी जाणार आहोत. तुम्ही येऊ नका हे सांगण्याचा त्यांना अधिकार नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचतील असं सांगण्यात आलं होतं. ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar enforcement directorate ed mumbai police sgy
First published on: 27-09-2019 at 12:59 IST