मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ६० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सगळे आकडे समोर आल्यानंतर पक्षाची पुढील रणनीती ठरविली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत मोठे कष्ट घेतले आहे. त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाष्ट्रात आमच्या बाजुने वातावरण असल्याचे बघायला मिळाले. मतदाानोत्तर चाचण्यांच्या माध्यमातून युतीच्या २२० जागा निवडून येणार, असा सतत प्रचार केला जात आहे. परंतु प्रत्यक्ष या निवडणुकीत मोदी किंवा ३७० अनुच्छेद यांचा काही परिणाम झालेला नाही, असा त्यांचा दावा आहे.
गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस सरकारने काही भरीव कामगिरी केलेली नाही. शेतकरी कर्जमाफी योजनेचा बट्टय़ाबोळ झालेला आहे. अशा परिस्थित युतीच्या एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जागा येऊ शकत नाहीत आणि जर तशा जागा आल्या तर काही तरी मतदानयंत्रणांमध्ये (ईम्हीएम) घोटाळा आहे, असा त्याचा अर्थ होणार, असे आमचे स्पष्ट मत आहे, असे पाटील यांचे म्हणणे आहे.
