मुंबई: पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन २२ ऑक्टोबरपासून पुन्हा सेवेत येणार आहे. या मार्गावर रुळांसह अन्य कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण होताच नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर तीन वर्षानंतर या मार्गावर मिनी ट्रेन धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान डोंगर भागातून जाणाऱ्या रुळांचे मोठे नुकसान झाले होते. रुळांखालील खडीही वाहून गेल्या होत्या. त्यामुळे नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा मार्ग बंद ठेवण्यात आला. बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे पर्यंटकांचा हिरमोड होत होता. तर स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर २०२० पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवाच सुरु केली. मात्र नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण मिनी ट्रेन सेवा बंदच ठेवण्यात आली होती. या मार्गावर रुळ, रुळांलगतचे क्रॅश बॅरियरसह अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या. ही कामे पूर्ण होताच नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची चाचणी केल्यानंतर येत्या २२ ऑक्टोबरपासून मिनी ट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेत येत असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी गुरुवारी नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन मार्गाची पाहणीही केली. नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनमधून प्रवासाला दोन तास ४० मिनिटे लागणार आहेत.
डाऊन मार्ग
नेरळहून सकाळी ८.५० वाजता मिनी ट्रेन सुटून माथेरानला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल
नेरळहून दुपारी २.२० वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि माथेरानला सायंकाळी पाच वाजता पोहोचेल.
अप मार्ग
माथेरानमधून दुपारी पावणे तीन वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि नेरळला सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल.
माथेरानहून सायंकाळी ४.२० वाजता मिनी ट्रेन सुटून नेरळला सायंकाळी ७ वाजता गाडी पोहोचणार आहे.
अमन लाॅज-माथेरान-अमन लाॅज शटल फेऱ्यांच्या वेळेत बदल
अमन लाॅज-माथेरान शटल सेवा- स.८.४५ वा., स.१०.४५ वा., दु.१२.०० वा,, दु. २.०५ वा., दु.३.४० वा., सायं. ५.४५ वा.
माथेरान-अमन लाॅज शटल सेवा-स.८.२० वा., स.१०.२० वा., स.११.३५ वा., दु. १.४० वा., दु.३.१५ वा., सायं.५.२० वा.