मुंबई : माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन लवकरच पुन्हा धावणार आहे. या मार्गाच्या रुळांसह अन्य कामे प्रमाणात पूर्ण करण्यात आली आहेत. त्यानंतर गुरुवारपासून या ट्रेनची चाचणी सुरू आहे. तब्बल तीन वर्षांनंतर ही ट्रेन धावणार आहे.  २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ  आणि माथेरान डोंगर भागातून जाणाऱ्या रुळांचे मोठे नुकसान झाले होते. रुळांखालील खडीही वाहून गेल्या होत्या. त्यामुळे नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा मार्ग बंद ठेवण्यात आला. यामुळे र्पयटकांचा हिरमोड होत होता. तर, स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती.

 नेरळ ते माथेरान मार्गावर आता नवीन रूळ, खडी तसेच अन्य कामे करण्यात आली आहेत. नेरळ ते अमन लॉज मार्गावर २० किलोमीटरच्या नवीन रुळांचे काम हाती घेण्यात आले. तर अपघात होऊ नये यासाठी रुळांच्या बाजूला उपाययोजनाही करण्यात आल्या. ही कामे पूर्ण होताच गुरुवारपासून नेरळ ते माथेरान मार्गावर मिनी ट्रेनच्या चाचणी सुरू करण्यात आली. त्यामुळे मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेची लाखोंची कमाई..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 सध्या माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू आहे. या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. माथेरान ते अमन लॉज शटल फेऱ्यांमधून एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांत मध्य रेल्वेने एक कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.  तर, पाच महिन्यांत १ लाख ५४ हजार प्रवाशांनी प्रवास केला.