बिबळ्या, कोल्ह्य़ाची जोडी दाखल; लवकरच पांढरा सिंह, वाघ, झेब्रा, जिराफ येणार

मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेत मंगलोर प्राणीसंग्रहालयातून बिबळ्या आणि कोल्ह्य़ाची जोडी दाखल झाली आहे. या प्राण्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या पिंजऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी एक ते दीड महिना लागणार आहे. त्यानंतरच बिबळ्या, कोल्ह्य़ाचे दर्शन मुंबईकरांना होईल. याशिवाय लवकरच सिंह, वाघ यासह मोठय़ा संख्येने देशी आणि परदेशी प्राणी-पक्षीही दाखल केले जाणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून राणीच्या बागेचा विकास केला जात आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये राणीच्या बागेत पेंग्विन आल्यापासून पर्यटकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली. पेग्विननंतर आणखी प्राणी व पक्षी आणले जाणार आहेत. सोमवारी  राणीच्या बागेत मंगलोर येथील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातून बिबळ्या व कोल्ह्य़ाची नर-मादीची जोडी आणण्यात आली. त्यांच्यासाठी स्वतंत्र पिंजऱ्यांचे काम सुरू असून तोपर्यंत अन्य पिंजऱ्यांत ठेवण्यात आल्याचे राणीबागचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

बिबळ्यांसाठी चिकन, बीफ

दोन्ही बिबळ्यांसाठी रोज तीन ते चार किलो चिकन आणि बीफचा खुराक देण्यात येतो. त्यांच्या प्रकृतीवरही डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.

झेब्रा, जिराफ, चिंपांझी आणि फ्लेमिंगोही..

राणीच्या बागमध्ये लवकरच झेब्रा, जिराफ, चिंपांझी आणि फ्लेमिंगो असे परदेशी प्राणी व पक्षी, तर गुजरातमधून पांढरा सिंह, औरंगाबादमधून वाघाची जोडी, तरस, अस्वल असे देशी प्राणीही येणार आहेत. वाघ आणि सिंहासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. मे अखेरपर्यंत सिहांची जोडी राणीबागमध्ये दाखल होईल, अशी माहिती देण्यात आली. वाघ येण्यासाठी चार ते पाच महिने लागतील. चित्ता, पाणघोडा, वॅलेबी, ओकापी, इमू, शहामृग, रिंगटेल लेमूर हे प्राणीदेखिल आणले जाणार असून त्यांच्यासाठी पिंजरे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात वाघ, आशियाई सिंह, तरस, लांडगा, देशी अस्वल, बाराशिंगा, काकर, चितळ, नीलगाय, चौशिंगा, काळवीट, लहान मांजर, सांबर, चितळ, काकर हे प्राणी आणले जातील.