पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी हार्बरला कुर्ला येथे उन्नत थांबा; टिळकनगर ते कसाईवाडादरम्यान उड्डाणपूल
मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प फक्त मुख्य मार्गावरील प्रवाशांसाठी नाही, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पासाठी कुर्ला स्थानकातील हार्बर मार्गाचे प्लॅटफॉर्म उन्नत करण्यात येणार आहेत. तर सध्या हार्बर मार्गासाठी असलेल्या दोन प्लॅटफॉर्मच्या जोडीला एक टर्मिनल प्लॅटफॉर्मही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कुल्र्याहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल गाडय़ा सुरू करणे शक्य होईल. या उन्नत प्लॅटफॉर्मसाठी टिळकनगर ते कसाईवाडा यादरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येईल.
पाचवी-सहावी मार्गिका कुल्र्याहून सीएसटीपर्यंत आणण्यासाठी मध्य रेल्वेला जागेची अडचण येत आहे. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका उपलब्ध असल्या, तरी त्या मालगाडीच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे त्या मार्गिका वापरता येणार नाहीत. परिणामी या स्थानकातील हार्बर मार्गावरील दोन प्लॅटफॉर्म आठ मीटर वर उचलले जाणार आहेत. त्यासाठी टिळकनगर स्थानकापुढे सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याखालून रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल कुर्ला स्थानकातून पुढे कसाईवाडा पुलाजवळ उतरेल आणि तेथून सध्याच्या मार्गाला जोडला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ प्रकल्प अधिकाऱ्याने दिली.
या उड्डाणपुलावर हार्बर मार्गाचे दोन उन्नत प्लॅटफॉर्म असतील. त्याशिवाय येथे एक टर्मिनल प्लॅटफॉर्मही उभारला जाणार आहे. या टर्मिनल प्लॅटफॉर्मवरून पनवेलच्या दिशेने कुर्ला लोकल चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील अनेक प्रवासी पनवेल-कुर्ला यादरम्यान प्रवास करतात. त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. हार्बर मार्गाचे सध्याचे प्लॅटफॉर्म पाडून त्या मार्गिकांवरून लांब पल्ल्याच्या गाडय़ा चालवल्या जातील. या गाडय़ांना कुर्ला स्थानकात प्लॅटफॉर्मची आवश्यकता नसल्याने त्यांची वाहतूक सुरळीत होईल, असेही त्याने स्पष्ट केले.
तसेच सध्या कुल्र्यातील ओस पडलेल्या ९-१० क्रमांकांच्या प्लॅटफॉर्मजवळ सरकते जिने बसवण्यात येतील. हे जिने पादचारी पुलाला जोडले जातील. या पुलावरून वर चढल्यास हार्बर मार्गाच्या उन्नत प्लॅटफॉर्मवर जाता येईल. हा आराखडा तयार झाला असून तो रेल्वे बोर्डाकडे अंतिम मंजुरीसाठी गेल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New elevated terminal for harbour line at kurla
First published on: 25-05-2016 at 02:00 IST