मुंबई : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था व अधिकच्या तुकड्यांना कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्त्वावर अभ्यासक्रम सुरू करण्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यात विभागाने मान्यता दिली आहे. राज्यातील संस्थाचालकांना याचा फायदा घेता येणार आहे. तसेच या निर्णयामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यासाठी ज्या संस्थानी किंवा महाविद्यालयांनी नवीन किंवा अधिकच्या तुकड्यांना कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्वावर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले होते. अशा संस्थांना शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून व्यावसायिक अभ्यासक्रम राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था व अधिकच्या तुकड्यांसाठी निरीक्षण समितीमार्फत प्राप्त झालेल्या अर्जाची व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांकडून छाननी करून योग्य त्या शिफारशीसह २०२५-२६ पासून द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था व अधिकच्या तुकड्यांना कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यात विभागाने घेतला आहे.
द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांना मान्यता देण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे मिळालेल्या अर्जांची व दस्तावेजांची छाननी करण्यात आली. त्यानंतर आवश्यक मानकांची पूर्तता केलेल्या ६६ संस्थांच्या एकूण ९१ तुकड्यांना २०२५-२६ पासून, तसेच नवीन संस्थेत नवीन किंवा अधिकच्या तुकड्यांना कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७१ संस्थांच्या एकूण १०६ तुकड्यांना दस्ताऐवजांमधील त्रुटींची पूर्तता करण्यास सांगून २०२५-२६ पासून द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.