कर्करोगग्रस्त तरुणीच्या आत्मकथनातून सामाजिक चळवळीचा जन्म
संवेदना जाग्या असल्या म्हणजे हृदयाचे आर्त मनामनांत पोहोचते आणि प्रेमाच्या भाषेला माणुसकीचा अर्थ प्राप्त होतो, या अनुभवाचा आनंद विदर्भातील तरुणाईला रविवारी, ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या निमित्ताने मिळाला. गेल्या दहा-बारा दिवसांतील काही घटनांनी या तरुण मनांचा असा ठाव घेतला, की कालचा ‘व्हॅलेन्टाइन डे’ खऱ्या अर्थाने ‘प्रेम दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यातून जन्माला आली, माणुसकीला साद घालणारी एक चळवळ!.. मानवतेच्या आणि सहृदयतेच्या आगळ्या कहाणीतून चार शहरांमध्ये प्रेम दिनाच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही चळवळ लगेचच अन्य गावांतही पसरली आहे.
अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांच्या ‘प्रयास’ सेवाभावी संस्थेतर्फे युवकांसाठी ‘सेवांकुर शिबिरे’ भरविली जातात. तरुणांना समाजाची, समाजातील समस्यांची आणि जगण्याच्या अनेक बाजूंची ओळख करून देणे यासाठी या शिबिरांचा ‘प्रयास’ सुरू असतो. गेल्या ५ फेब्रुवारीला राज्याच्या २२ जिल्ह्य़ांमधील सुमारे ३०० तरुणांनी वध्र्याच्या सेवाग्राम आश्रम परिसरातील या शिबिरात हजेरी लावली आणि तेथील एका हेलावणाऱ्या अनुभवातून जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलून गेली. निमित्त होते, २२ वर्षांच्या एका कॅन्सरग्रस्त तरुणीच्या जिद्दीच्या आणि उमेदीच्या कहाणीचे.. वयाच्या बाराव्या वर्षांपासून कॅन्सरशी झगडणारी ही तरुणी आता कॅन्सरलाच आपला ‘बॉयफ्रेंड’ मानते. आतापर्यंत चार वेळा केमोथेरपी झाली, तरीही कॅन्सरने तिची साथ सोडलेली नाही. गेल्या दहा वर्षांत मुंबईच्या टाटा मेमोरियलमध्ये एवढय़ा खेपा झाल्या, की आता ते आपले दुसरे घरच आहे, असे ती सांगते. सवयीच्या झालेल्या वेदना झेलतच या तरुणीने वाचन, लेखन, संगीत आणि कवितांचा छंद जोपासला आणि त्यातून तिला जगण्याचं बळ मिळालं. आता मला जगायचं आहे. कॅन्सरची डॉक्टर व्हायचं आहे आणि अशा रुग्णांना आजाराशी लढण्याचं बळ द्यायचं आहे, असा अनुभव त्या तरुणीनं त्या शिबिरात सांगितला, आणि सारी हृदयं हेलावली..
या तरुणीनं दहावीला ८४ टक्के, बारावीला ८० टक्के गुण मिळवलेत. बी.एस्सी.च्या चौथ्या सत्रात ९० टक्के गुण मिळवून विद्यापीठात पहिली आलेली ही तरुणी अमरावतीच्या महाविद्यालयातच बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षांत शिकतेय. त्यासोबतच कर्करोगावरील
उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचीही जिद्दीने जुळवाजुळव करते आहे. या मुलीने आपले आत्मकथन संपविले, आणि शिबिरात जमलेल्या तरुणांनी विचार सुरू केला. हिच्यासाठी, हिच्यासारख्या अनेकांसाठी काही तरी केलं पाहिजे, असं ठरलं आणि डॉ. सावजी यांनी या विचारांना दिशा दिली. १४ फेब्रुवारी रोजीचा व्हॅलेन्टाइन डे वेगळ्या पद्धतीने, ‘मानव प्रेम दिन’ म्हणून साजरा करावा. अशा आजारांनी ग्रासलेल्यांना केवळ पैशाची मदत पुरेशी नसते, तर त्यांना भावनिक आधारही हवा असतो. या लढाईत आपण तिच्यासोबत आहोत, हे दाखवून देण्यासाठी २४ तास उपवास करावा, असेही डॉ. सावजी यांनी सुचविले, आणि मुले उपवासाला बसली.. लगेचच ‘व्हॅलेन्टाइन डे’ची आखणी सुरू झाली. अशा आजारांनी ग्रासलेली परंतु त्यांच्याशी जिद्दीने लढणारी माणसे हा आपला आदर्श असला पाहिजे. पदोपदी निराश होणाऱ्या, खचून जाणाऱ्या अनेकांसमोर हे आदर्श पोहोचविण्याचा संकल्प सोडला गेला. काल ‘मानव प्रेमदिनी’च जळगाव, यवतमाळ, अमरावती, नागपूर या चार शहरांतील नागरिकांनी त्यांच्या घरातील रद्दी दान करण्याचे आवाहन करण्यात आले, आणि तब्बल बारा हजार किलो रद्दी कालच्या काही तासांतच या स्वयंसेवी तरुणाईने घरोघरी जाऊन, चौकाचौकांत थांबून गोळा केली. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने पैसेही आणून दिले. हृदयाला साद घालणाऱ्या या उपक्रमात, केवळ एका आवाहनातून लाखभराची रोकड आणि लाखभर रुपये किमतीची रद्दी गोळा झाली. जळगावातील मूलजी जेठा महाविद्यालयाने तर, या उपक्रमाचे पालकत्वच स्वीकारले.

गावोगावच्या गरजूंना मदतीचा हात
आता अनेक गावांतील तरुणांनी असे उपक्रम सुरू करून गावोगावीच्या गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकारही घेतला आहे. कालपासून डॉ. सावजी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे, एसएमएसद्वारे विचारणेसाठी आणि मार्गदर्शनासाठी असंख्य तरुणांनी संपर्कही साधला.
‘प्रयास’च्या शिबिरात एका कॅन्सरग्रस्त मुलीचे जगण्याची उमेद जागविणारे एक लहानसे कथन असंख्य तरुणांना एका वेगळ्या, विधायक वाटचालीची दिशा दाखविणारे ठरले आहे.