राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३५० जागा वाढणार

मुंबई : गतवर्षी राज्यामध्ये १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आल्यानंतर यंदा मुंबईमध्ये आणखी एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी) अंधेरीतील रुग्णालयामध्ये हे नवीन महाविद्यालय सुरू होणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या महाविद्यालयासाठी परवानगी दिली असून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये ५० जागांची मंजुरी दिली आहे.

त्यामुळे यंदा मुंबईमध्ये आणखी एका नवीन महाविद्यालयाची भर पडणार आहे. त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षामध्ये आयोगाने महाराष्ट्रातील अभिमत विद्यापीठांमध्ये ३०० जागांना मान्यता दिल्याने यंदा राज्यामध्ये ३५० नव्या जागांची भर पडणार आहे. या जागांचा समावेश अखिल भारतीय कोट्यामध्ये होणार असून, ५ सप्टेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे.

मुंबईमध्ये नव्याने मान्यता मिळालेल्या अंधेरीतील ईएसआयसी रुग्णालयामध्ये ५० जागांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आणखी एक नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरीतील या महाविद्यालयातील १५ टक्के म्हणजे आठ जागा या अखिल भारतीय कोट्यासाठी तर २० ते ३० टक्के जागा ईएसआयसीमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव असणार आहेत.

त्यामुळे यातील निम्म्या जागा या सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच या ईएसआयसीमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी या महाविद्यालयामध्ये अवघे २४ हजार रुपये शुल्क वर्षाला आकारण्यात येणार आहे. तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क जवळपास एक लाख रुपये इतके असणार असल्याची माहिती ईएसआयसीच्या प्रादेशिक संचालक अभिलाषा झा यांनी सांगितले.

अभिमत विद्यापीठांमध्ये ३०० जागा

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदा २ हजार ७२० पदवी अभ्यासक्रमांच्या जागांना मान्यता दिली आहे. यामध्ये १ हजार १०० जागा या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मंजूर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाच्या ३५० जागांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये अभिमत विद्यापीठांमध्ये ३०० जागांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये नागपूरमधील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ५०, पुण्यातील भारतीय विद्यापीठ १०० जागा, औरंगाबादमधील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयात ५० जागा आणि सांगलीमधील भारतीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठामध्ये १०० जागांना मान्यता मिळाली आहे.

खासगी महाविद्यालयांच्या निर्णयाकडे

पालकांचे लक्ष अभिमत विद्यापीठांमधील शुल्क हे प्रचंड असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या जागांचा फारसा लाभ होणार नसल्याने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागा वाढविण्याबाबत आयोगाकडून काय निर्णय येतो याकडे पालकांचे लक्ष आहे. राज्य कोटा फेरी सुरू होण्यापूर्वी खासगी महाविद्यालयांसाठी वाढीव जागांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पर्याय मिळतील आणि राज्यात प्रवेश निश्चित होण्याची शक्यता वाढतील अशी पालकांची अपेक्षा आहे.