मुंबई : अभिजात मराठी साहित्य आणि कलासंस्कृतीची समृध्द परंपरा आणि त्यात होत गेलेले बदल याचे बिलोरी दर्शन घडवणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये नव्या रंगकर्मींच्या विचारातून मंचित झालेल्या नव्या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची प्रस्तुती असलेल्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय !’ या नाटकाचा पहिलावहिला प्रयोग रंगणार आहे.
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय !’ ही मूळ एकांकिका अखिल भारतीय नाट्यपरिषदेने घेतलेल्या एकांकिका स्पर्धेबरोबरच अनेक नामांकित स्पर्धांमधून लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध विभागांत विजेती ठरली. या एकांकिकेचा युवा दिग्दर्शक विनोद रत्ना यानेच ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय !’च्या संहितेचा विस्तार करत ते दोन अंकी व्यावसायिक नाटक म्हणून प्रेक्षकांसमोर आणले आहे.
मूळ एकांकिकेतील कलाकार समृद्धी कुलकर्णी, श्रेयस जोशी, वैभव रंधवे आणि तंत्रज्ञ या नव्या नाटकातही प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नाटकाचा पहिला प्रयोग मराठी रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर रोजी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये रंगणार आहे.
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय !’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग
‘नाटक हाही एक वाङ्मय प्रकार. एकांकिका, दीर्घांक, दोन अंकी नाटक अशा पद्धतीने विविध साहित्यिकांच्या कथा-कादंबऱ्यांवर बेतलेले नाटक रंगभूमीवर आले आहेत. महेश एलकुंचवार यांच्यासारख्या दिग्गजाने तर ‘वाडा चिरेबंदी’सारखी नाट्यत्रयी लिहिली. नाटक आणि साहित्याचे हे असे दृढ नाते आहे.
साहित्य आणि मराठी संस्कृतीचा गौरव करणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर एका युवा लेखक-दिग्दर्शकाच्या एकांकिकेतून उभे राहिलेले दोन अंकी नाटक ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’चा प्रयोग होणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे,’ अशी भावना नाटकाचे प्रस्तुतकर्ता चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. देशभरात विविध ठिकाणी साहित्यावर आधारित कार्यक्रम होत असताना मुंबईत साहित्य, नाटक, कला सगळ्यांना एकत्र आणणारा लिटफेस्टसारखा भव्य महोत्सव पहिल्यांदाच होत आहे. त्यासाठी ‘लोकसत्ता गप्पा’, ‘लोकांकिका’सारखे उपक्रम करणाऱ्या ‘लोकसत्ता’ने पुढाकार घेतला आहे, ही महत्त्वाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
