विनायक डिगे

मुंबई : महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कर्करोग रुग्णांसाठी आशास्थान असलेल्या टाटा कर्करोग रुग्णालयाची नवी १७ मजली इमारत येत्या चार वर्षांत उभी राहणार आहे. सध्याच्या रुग्णालयासमोरच असलेल्या पाच एकर जागेवर पुढील महिनाभरात नवीन रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.

परळ येथील टाटा रुग्णालय हे कर्करोगांच्या रुग्णांवर उपचार करणारे देशातील पहिले रुग्णालय आहे. या रुग्णालयात दरवर्षी साडेचार लाख रुग्णांवर उपचार केले जातात. आता रुग्णांची वाढती संख्या आणि उपचारासाठी अपुरी पडत असलेली जागा या बाबी लक्षात घेऊन टाटा कर्करोग रुग्णालयाने हाफकिन संस्थेच्या ५ एकर जागेवर १७ मजली इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी टाटा रुग्णालयाचे उपसंचालक आणि कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पाच एकरपैकी अडीच एकर जमिनीवर डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारण्यात आले आहे. तसेच रुग्णांसाठी धर्मशाळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर, उरलेल्या अडीच एकर जागेमध्ये तळमजला अधिक १७ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये तीन तळघरे बांधण्यात येणार आहेत. इमारतीत ५८० रुग्णशय्यांचे नियोजन असून त्यातील १०० खाटा ‘केमो’ उपचार पद्धतीच्या रुग्णांसाठी राखीव असतील.
२१ शस्त्रक्रियागृहे या रुग्णालयात २१ शस्त्रक्रियागृहे असणार आहेत. यातील १५ शस्त्रक्रियागृहे मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी, तर सहा लहान शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणार आहेत. सध्या अवघड आणि किचकट शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना एक महिना प्रतीक्षा करावी लागते. मात्र या २१ शस्त्रक्रियागृहामुळे प्रतीक्षायादी कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती टाटा रुग्णालयाचे उपसंचालक आणि कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८०० कोटी रुपये खर्च नवीन इमारतीसाठी जवळपास ८०० कोटी रुपये खर्च येणार असून हा निधी केंद्र सरकारच्या अणू ऊर्जा विभागाकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याला केंद्र सरकारच्या विभागांची मान्यता मिळाली असून त्याचे कार्यादेशही जारी करण्यात आले आहेत.