जानेवारीपासून कायमस्वरूपी एकच नोंदणी, कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची सुविधा

मंगल हनवते

मुंबई : म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात नोंदणीला सुरुवात होणार असून नोंदणी आता एकदाच करावी लागणार आहे. ही नोंदणी कायमस्वरूपी असणार असून या नोंदणी क्रमांकाच्या आधारे भविष्यात कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. ही नोंदणी करताना इच्छुकांना आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे जोडावी लागणार आहेत. परवडणाऱ्या दरात हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडाची ही नववर्षांतील भेट ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हाडा सोडतीतील मानवी हस्तक्षेप टाळून ती अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी संबंधित प्रक्रिया पूर्णत: बदलण्यात आली आहे. नव्या बदलानुसार आता प्रत्येक सोडतीसाठी नोंदणी करण्याची गरज नाही. महत्त्वाचे म्हणजे आता करण्यात येणारी नोंदणी कायमस्वरूपी असणार आहे. या नोंदणीच्या आधारे वर्षांनुवर्षे सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर नोंदणीधारकाला मुंबई मंडळ, कोकण मंडळ वा इतर कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करणे शक्य होणार आहे. नोंदणीधारकाला दर पाच वर्षांनी निवासाचा दाखला सादर करावा लागणार आहे. तर प्रत्येक वर्षांला उत्पन्नाचा दाखला, आयकर विवरण पत्र सादर करावे लागणार आहे.

या नव्या नोंदणीस जानेवारीच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवडय़ात सुरुवात होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मडंळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. सोडतीच्या अ‍ॅपवरून ही नोंदणी करता येणार असून यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, निवासाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आनलाईनच्या माध्यमातून सादर करावी लागणार आहेत. तर सामाजिक आणि इतर प्रकारच्या आरक्षणातील नोंदणीधारकांसाठी प्रमाणपत्राचा नमुना म्हाडाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून त्यानुसार संबंधित प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. एकूण नोंदणीधारक, अर्जदाराला आता केवळ पाच प्रमाणपत्रे सादर करावी लागणार आहेत. तर नोंदणी झाल्यानंतर ज्या ज्या मंडळाची सोडत जाहीर होईल, त्या मंडळाच्या सोडतीसाठी नोंदणीधारक आपल्या इच्छेनुसार अर्ज करू शकणार आहेत. आता प्रत्येक सोडतीसाठी नवीन नोंदणीची गरज नाही. याच कायमस्वरूपी नोंदणीवर इच्छुक भविष्यात सोडतीसाठी अर्ज करू शकतील, असेही बोरीकर यांनी सांगितले.

नववर्ष स्वागताचा सर्वत्र उत्साह; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, रेल्वे आणि बससेवेसह सर्व यंत्रणांकडून सुविधा

केवळ घराची चावी घेण्यासाठीच..

नव्या बदलानुसार अर्जदाराची आधीच पात्रता निश्चिती होणार असल्याने सोडतीनंतर विजेत्यांना तात्काळ देकार पत्र दिले जाणार आहे. हे देकार पत्र मिळाल्यानंतर जो विजेता घराची संपूर्ण रक्कम भरेल आणि त्यानंतर त्याला एका दिवसांत घराची चावी देण्यात येणार आहे. तर महत्त्वाचे म्हणजे सोडतीनंतर कोणत्याही बाबीसाठी म्हाडाची पायरी विजेत्यांना चढावी लागणार नाही. केवळ चावी घेण्यासाठी, करार करण्यासाठी एकदाच म्हाडाच्या कार्यालयात यावे लागणार आहे. त्यातही सोडतीत निवासी दाखला मिळालेल्या घरांचाच समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे घराची रक्कम भरल्यानंतरच ताबा देण्यात येणार आहे. ही विजेत्यांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

सावधान..!”थर्टी फर्स्ट’च्या बंदोबस्तासाठी २५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी सज्ज !; गुन्हे दाखल करणार

कर्मचारी – अधिकारी – दलालांचा हस्तक्षेप नाही

म्हाडा सोडतीतील विजेत्यांना विविध कागदपत्रे गोळा करून ती घेऊन म्हाडात जावे लागत होते. संबंधितांची फाईली एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात फिरत असल्याने अधिकाऱ्यांकडे खेटे घालावे लागत होते. त्यातच दलालांचा तगादा सुरूच असायचा. पण आता मात्र दलालांनाच, नव्हे तर कर्मचारी वा अधिकाऱ्यांचाही हस्तक्षेप सोडतीनंतरच्या प्रक्रियेत होणार नाही. पेन, नस्ती (फाईल) वा कोणत्याही कागदपत्राचा या प्रक्रियेत वापर होणार नाही. आता सोडतीतील भ्रष्टाचारास १०० टक्के आळा बसेल, असा दावा म्हाडाकडून करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year gift from mhada buy a house registration from january facility apply board draw ysh
First published on: 27-12-2022 at 00:59 IST