राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या कल्याण-पनवेल गाडीत प्रवाशाच्या मारहाणीत जखमी झालेल्या वाहक दिपमाला सोनवणे हिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अभिषेक सिंग या प्रवाशाने एसटी वाहक सोनवणे यांना मारहाण केल्याची घटना ४ जून रोजी घडली होती. त्यानंतर या महिलेस सरकारच्या मनोधैर्य योजनेतून मदत करण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षां गायकवाड यांनी घेतला होता. मात्र सोनवणे यांच्या मदतीचा प्रस्ताव सरकारच्या कोणत्याच योजनेत बसत नसल्याने त्यांना वैद्यकीय उपचारार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याची विनंती गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार सोनवणे यांना ही मदत मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आहे.

‘हिट अॅण्ड रन’प्रकरणी अल्पवयीन मुलास अटक
मुंबई : भरधाव वेगाने गाडी चालवून एका महिलेचा बळी घेतल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी सोमवारी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. गुरूवारी संध्याकाळी मालाडच्या मालवणीच्या गेट क्रमांक ८ येथे एका इनोव्हा गाडीने दिलेल्या धडकेत लिला गुप्ते (५८) यांचा मृत्यू झाला होता तर त्यांची मुलगी संगीता गोहील जखमी झाली होती. अपघातानंतर गाडीचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता. ही गाडी हाजी मुजीब खान या तरुणाची होती. गुरूवारी त्याच्या १६ वर्षीय अल्पवयीन मित्राने ही गाडी चालविण्यासाठी घेतली होती. पोलिसंनी मुजीब खान यालाही या गुन्ह्यात अटक केली आहे.

डोंबिवलीत एक लाखाच्या बनावट नोटा जप्त
डोंबिवली : डोंबिवलीजवळील दिवा येथे राहणाऱ्या रानी मंडळ (३५) या महिलेकडून विष्णुनगर पोलिसांनी एक लाखाच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या महिलेला न्यायालयाने रविवापर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  
डोंबिवली पश्चिमेत आनंदनगर येथे गुरूनाथ पाटील यांचा मासळी विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी रानीने गुरूनाथ यांच्याकडून शंभर रुपयांची मासळी विकत घेतली. एक हजार रूपयांची नोट विक्रेत्याला देऊन नऊशे रूपये परत घेतले. पैसे घेतल्यानंतर रानी वेगाने निघून गेली. म्हणून मासळी विक्रेत्याला संशय आला. त्याने एक हजार रूपयाच्या नोटेची खात्री केल्यानंतर ती नोट बनावट असल्याचे उघड झाले. विष्णुनगर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेऊन रविवारी दुपारी पुन्हा मासळी खरेदीसाठी आलेल्या रानीला अटक केली.

घरात महिलेचा मृतदेह आढळला
मुंबई : कांदिवलीत एका महिलेचा घरामध्येच मृतदेह आढळून आला. पाय घसरून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. समतानगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मारूती टॉवर्समध्ये सीमा गुप्ता (४५) मृतदेह आढळून आला. घरातील दार आतून बंद होते ते पाहता यामागे घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. बाथरूममधून अंघोळ केल्यानंतर बाहेर पडताना पाय घसरून त्या पडल्या असाव्या आणि मार लागून त्यांचा मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक शक्यता समतानगर पोलिसांनी व्यक्त केली आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.