गेली ४० वर्षे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करणारे महेंद्र पारीख यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी गुरुवारी (४ मे) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व सून, एक मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे. कांदिवली येथील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना गुरुवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा >>> निर्मल लाईफ स्टाईलप्रकरणात २१ साक्षीदारांची पडताळणी
तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पारीख हे १९९२ ते २०११ अशी १९ वर्षे इंडियन एक्स्प्रेस समूहात वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. त्यानंतर निवृत्तीपर्यंत (२०१४) हिंदुस्तान टाईम्समध्ये ते कार्यरत होते. त्यांना वार्षिक सर्वोत्कृष्ट छायाचित्रासाठी रामनाथ गोएंका पुरस्कार, २ वेळा कॉमनवेल्थ पुरस्कार, मुंबई प्रेस क्लबचा पुरस्कार आदी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.