मुंबई : महामार्गावर प्रवास करताना काही वाहनचालक वाहनाच्या दर्शनी काचेवर फास्टॅग लावत नाहीत किंवा फास्टॅग हातात घेऊन दाखवितात, अशा वाहनचालकांचे फास्टॅग काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) याबाबत नवा नियम लागू केला आहे. या नियमांमुळे पथकर नाक्यांवर गर्दी कमी होण्यास मदत मिळेल. तसेच गैरप्रकारही रोखण्यात यश येईल, असा दावा करण्यात येत आहे.
‘टॅग इन हॅड’ किंवा ‘लूज फास्टॅग’ म्हणजे काय ?
फास्टॅग वाहनाच्या समोरील काचेवर न चिकवता, वाहनचालक ते हातात घेऊन टोल स्कॅनरसमोर दाखवतात. याला ‘टॅग इन हॅड’ किंवा ‘लूज फास्टॅग’ म्हणतात. काही वाहनचालक जाणूनबुजून वाहनाच्या काचेवर फास्टॅग चिटकवत नाहीत. त्यामुळे पथकर भरताना अडचणी येतात. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. एकाच्या चुकीमुळे सर्व वाहनचालकांना विलंब सहन करावा लागतो.
वाहनचालकांचे फास्टॅग काळ्या यादीत कसे टाकणार ?
नवीन नियमानुसार हातात धरून फास्टॅग स्कॅन करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. पथकर भरणा केंद्रावर अशा फास्टॅगची तक्रार करण्यात येणार आहे. त्यानंतर, तो फास्टॅग पुन्हा वापरता येणार नाही किंवा वाहन कोणत्याही अडचणीशिवाय पथकर भरणा केंद्र ओलांडू शकणार नाही. तसेच बऱ्याच हलक्या वाहनांची नोंदणी असलेले फास्टॅग अवजड वाहनांसाठी वापरले जातात. त्यामुळे पथकर भरणा केंद्रावर चुकीचे स्कॅन होऊन कमी पैसे आकारले जातात. असे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘टॅग इन हॅड’ किंवा ‘लूज फास्टॅग’ दिसताच त्याची तक्रार करून त्यांना काळ्या यादीत टाकता येईल, असे एनएचएआयकडून सांगण्यात आले.
तक्रार करण्यासाठी इमेल आयडी
फास्टॅगचा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी एनएचएआयने एक इ-मेल आयडी तयार केला आहे. पथकर भरणा केंद्रावरील कर्मचाऱ्यांंना या ई-मेलवर संबंधित फास्टॅग धारकांची तक्रार करता येईल. त्यानंतर एनएचएआयद्वारे त्या फास्टॅगधारकाचे फास्टॅग काळ्या यादीत टाकून त्वरित कारवाई केली जाईल.
वाहनचालकांनी सतर्क राहावे
वाहनचालकांना फास्टॅगबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. वाहनाच्या समोरील काचेच्या दर्शनी भागावर फास्टॅग सुस्पष्टरित्या लावणे आवश्यक आहे. हातात फास्टॅग धरून स्कॅन करणे टाळावे. बॅक किंवा फास्टॅग प्रदात्याकडून येणाऱ्या सूचना नियमितपणे तपासणे व त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
पथकर भरणा केंद्रावरील रांगा कमी होणार
नवीन नियमाचे वाहनचालकांनी पालन केल्यास पथकर भरणा केंद्रावरील लांबच्या लांब रांगा कमी होतील. पथकर भरणा केंद्रावरील वेळेची बचत होईल. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल.