मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहिर केल्याप्रमाणे आता १५ आॅगस्टपासून राज्यभरासह देशभरातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारीतील महामार्गावरील पथकर नाक्यांवरुन प्रवास करणार्यांसाठी वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. गुरुवारपासून हा वार्षिक पास एनएचएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अॅपवर उपलब्ध होणार आहे. या वार्षिक पासच्या माध्यमातून पासधारकांना एनएचएआयच्या अखत्यारितील महामार्गांवरून ३००० रुपयांत २०० फेर्या विना पथकर अर्थात पथकर न भरता प्रवास करता येणार आहे.

गुरुवारपासून हा वार्षिक पास खरेदी करत पथकर भरण्याच्या कटकटीतून मुक्ति मिळवता येणार आहे. पण वार्षिक पासची ही योजना केवळ खासही चारचाकी वाहने, जीप आणि व्हॅनसाठीच लागू आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक वाहनांना ही योजना लागू नाही. राष्ट्रीय महामार्गांवरील दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.

द्रुतगती महामार्गांवरील पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, प्रवाशी-वाहनचालकांचा वेळ वाचविण्यासाठी एनएचएआयने वार्षिक पास योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नितीन गडकरी यांनी यासंबंधीची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर १७ जूनला केंद्र सरकारने यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेनुसार १५ आॅगस्टपासून वार्षिक पास योजना सुरु होईल असे जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार आता वार्षिक पास योजनेचा लाभ घेण्याची प्रतीक्षा संपणार आहे. गुरुवारपासून वार्षिक पास एनएचएआयच्या संकेतस्थळावर आणि अॅपवर उपलब्ध होणार आहे.

संकेतस्थळावर आणि अॅपवर जाऊन आपल्या फास्टॅग पात्रतेची पडताळणी करत ३००० रुपये ई पेमेंटने भरावी लागेल. ही रक्कम भरल्यानंतर दोन तासांने वार्षिक पास सक्रीय होईल आणि संबंधित वाहनांना एनएचएआयच्या महामार्गांवरुन पथकर न भरता प्रवास करता येणार आहे. ३००० रुपयांत एक वर्षे किंवा २०० फेर्या पथकर न भरता प्रवास करता येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. तर महत्त्वाचे म्हणजे वार्षिक पास योजना केवळ चार चाकी खासगी वाहने, जीप आणि व्हॅनसाठीच लागू आहे. व्यावसायिक योजनांसाठी ही योजना लागू नाही. एका वर्षासाठी किंवा २०० फेर्यांसाठी हा पास सक्रीय असेल. त्यानंतर पास संपुष्टात येईल. त्यानंतर पुन्हा ३००० रुपये भरत वार्षिक पास सक्रीय करता येणार आहे. तर हा पास वैध वाहनांसाठीच लागू असणार असल्याने तो इतर वाहनांना हस्तांतरीत करता येणार नाही.

वार्षिक पास योजनेचा राज्यभरातील एनएचएआयच्या अखत्यारितील महामार्गावरून दैनंदिन प्रवास करणार्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यानुसार पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-सोलापूरसह अन्य द्रुतगती महामार्गावर प्रवास करता येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर फास्टॅग वार्षिक पासची योजना लागू नसणार आहे. कारण हे महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) च्या अखत्यारीत आहेत.