मुंबई : ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सलग तीन दिवस ध्वजारोहण करण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने काढले आहे. मात्र आयत्या वेळी काढण्यात आलेल्या आदेशाचे पत्रक शाळांना १३ ऑगस्ट रोजी दुपारनंतर मिळाल्यामुळे मुंबईतील शाळांमध्ये बुधवारी ध्वजारोहण कार्यक्रमच झाला नाही. या पत्रकामध्ये ध्वजाराेहण संदर्भातील शिष्टाचाराबाबत स्पष्ट सूचना दिल्या नसल्याने मुख्याध्यापक व शाळा प्रशासनामध्येही संभ्रम आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ‘हर घर तिरंगा २०२५’ हे अभियान २ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे १३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सर्व शाळांमध्ये ध्वजारोहन समारंभ आयोजित करण्यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या होत्या. १३ व १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्याच्या, तसेच १५ ऑगस्ट रोजी दरवर्षीच्या नियमाप्रमाणे ध्वजारोहण करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या होत्या. मात्र मुंबईतील शाळांमधील मुख्याध्यापकांना ध्वजारोहण करण्यासंदर्भातील पत्रक १३ ऑगस्ट रोजी दुपारनंतर मिळाल्याने मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळांसह अनुदानित व खासगी शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रमच झाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. तीन दिवसांच्या ध्वजारोहणासंदर्भातील सूचना शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून विलंबाने मिळाल्याने बुधवारी ध्वजारोहण करणे शक्य झाले नसल्याचे शाळेतील शिक्षकांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात मुंबई शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत मला काहीही कल्पना नसल्याचे सांगितले.
परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता
परिपत्रक विलंबाने मिळाले असले तरी त्यामध्ये सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सध्या शाळांमध्ये परीक्षा सुरू असून, सकाळच्या सत्रातील परीक्षा या ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास आहे. त्यामुळे शिक्षकांना ध्वजारोहण कार्यक्रमाला जाणे अशक्य आहे. या अचानक आलेल्या पत्रकामुळे आता परीक्षेच्या वेळेत बदल करावा लागण्याची शक्यता असल्याचेही शिक्षकांकडून सांगण्यात आले.
ध्वजारोहणासंदर्भात संभ्रम
तीन दिवस ध्वजारोहण करण्यासंदर्भातील पत्रक विलंबाने मिळाले असले तरी त्यामध्ये ध्वजारोहणासंदर्भातील शिष्टाचार, नियमावली, कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचे, प्रमुख पाहुणे कोण असतील याबाबत काहीही स्पष्टपणे दिलेले नाही. शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातूनही काहीही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यासंदर्भात संभ्रम असल्याचे शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले.
अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये १३ ते १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच ध्वजारोहण कशा पद्धतीने करायचे यासंदर्भातील चित्रफितही पाठविण्यात आली होती. मात्र ध्वजारोहण का करण्यात आले नाही, याची माहिती घ्यावी लागेल. – सुजाता खरे, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका