डाव्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या ‘भारत बंद’मध्ये स्कूल बस, टॅक्सी आणि एसटीच्या काही संघटना सहभागी होणार नाहीत. बंदच्या काळात अनेक शाळांमध्ये परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र एसटीचा अधिकृत निर्णय सोमवारी तर टॅक्सी संघटनांचा शनिवारी जाहीर होणार आहे. केंद्रीय कामगार संघटना आणि डावे पक्ष यांनी २० आणि २१ फेब्रुवारीस भारत बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये सर्व क्षेत्रांतील कामगार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत असतानाच विद्यार्थ्यांचे कारण पुढे करत काही संघटनांनी त्यातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. टॅक्सी, रिक्षा, एसटी, बेस्ट अशी सर्व वाहतूक या बंदमध्ये सहभागी होणार असून आम्ही रेल्वेही बंद करणार असल्याचे कामगार नेते शरद राव यांनी बुधवारी जाहीर केले होते. मात्र त्यांचा हा दावा आता फोल ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गुरुवारचा रिक्षा मोर्चा फसल्यानंतर हा दुसरा धक्का राव यांच्या नेतृत्वाला बसणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.