ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू असली तरी त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा कोणताही विचार नाही, असे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत राणे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात असले तरी प्रदेश भाजप नेत्यांनी याआधीच तीव्र विरोध दर्शविल्याने राणे यांच्या भाजपमधील प्रवेशाची शक्यता अवघड असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली, तर राणे यांचा विचार होऊ शकतो, असा सूर भाजपमधील काही नेते अजूनही लावत असले तरी राणे यांना प्रवेश दिल्यास कोकणातील भाजपमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल याचा अंदाज पक्षनेतृत्वाला आल्याने राणे यांच्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली जात आहे. दरम्यान राणे यांच्या भाजपप्रवेशास शिवसेनेचा टोकाचा विरोध राहील, असेही स्पष्ट झाले आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिला तरी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे राणे यांनी सांगितले असले तरी ते भाजपमध्ये जाण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांनी काही काळापूर्वीच भाजपप्रवेशासाठी प्रयत्न केले होते. तेव्हा त्यास प्रदेश भाजप नेत्यांनी तीव्र विरोध केल्याने केंद्रीय नेतृत्वाने हा विषय बाजूला ठेवला होता. पण आता राणे यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे पाऊल उचलल्याने त्यांना भाजपकडून काही संकेत मिळाले आहेत का, अशी शक्यता वर्तविली जात आहे. गडकरी यांच्यामार्फत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी राणे यांच्याबाबत काही बोलणे झाल्याचीही चर्चा आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी या बाबींचा ठामपणे इन्कार केला आहे.
‘बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना प्रवेश नाही’
शिवसेना व भाजपमध्ये एक सामंजस्य करार झालेला आहे. एकमेकांना त्रास देणाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश न देण्याचे आमचे धोरण आहे. त्यामुळे नारायण राणे यांना भाजपमध्ये घेतले जाणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुखांना त्रास देणाऱ्यांना शिवसेनेत पदापि प्रवेश दिला जाणार नाही, या भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना साथ देणारे एकएक प्रमुख पदाधिकारी शिवसेना आपल्या गळाला लावत असून भुजबळांची ताकद खच्ची करण्याचे धोरण सेनेने अवलंबिले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मंगेश बनसोड आणि सिन्नरचे राजाभाऊ वाझे यांना शिवसेना भवनात आयोजित कार्यक्रमात उद्धव यांच्या उपस्थितीत सेनेत घेण्यात आले. नारायण राणे आणि छगन भुजबळ हे त्यांच्या पक्षांमध्ये नाराज असून ते बंड करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. राणे यांनी तर काँग्रेस सोडण्याचेच संकेत दिले असून भाजपमध्ये जाणार, अशा चर्चेला ऊत आला आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, मुळात या दोघांचीही आता बंड करण्याची क्षमता उरलेलीच नाही, अशी खिल्ली उद्धव यांनी उडविली. 
कोकणात नरकानुसाराचा वध करण्याची भूमिका आपण याआधीच मांडली असून, केवळ राणे यांच्या पराभवापुरती ही भूमिका मर्यादित नाही, तर सिंधुदुर्गातून दहशतवाद कायमचाच हद्दपार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. राणे तसेच भुजबळ यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना सेना कदापिही थारा देणार नाही. त्याचप्रमाणे सेना-भाजपमधील सामंजस्य करारानुसार  राणे यांना भाजपमध्येही प्रवेश दिला जाणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. राणे यांच्याविरोधात कोकणातील जनताच एकवटली असून यात भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. राणेसमर्थकांच्या दहशतीचे चटके कोकणातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही मोठय़ा प्रमाणात बसले असल्यामुळे भाजप त्यांना स्वीकरणार नाही. 
दरम्यान, राणे यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यासाठी त्या पक्षाचे काही नेतेच उत्सुक असल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
  संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2014 रोजी प्रकाशित  
 राणेंना भाजपमध्ये स्थान नाही!
ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू असली तरी त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा कोणताही विचार नाही

  First published on:  18-07-2014 at 05:13 IST  
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No space in bjp for narayan rane