मुंबई : विविध क्षेत्रांत विधायक आणि प्रेरणादायी कामामुळे दखलपात्र ठरणाऱ्या सामान्य नागरिकांमधील नऊ स्त्रियांचा ‘लोकसत्ता’तर्फे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी गौरव केला जातो. या पुरस्कारार्थीच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी व्यासपीठ खुले करण्यात आले असून ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार- २०२२’साठी आपल्या परिसरातील अशा कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती ‘लोकसत्ता’कडे पाठवण्याचे आवाहन वाचकांना करण्यात येत आहे.

अनेक स्त्रिया लहान वा वैयक्तिक स्वरूपात एखादे काम सुरू करतात आणि आपल्यासारख्या इतर अनेकांना सामावून घेत त्या कार्याचा वटवृक्ष होतो. स्त्रियांनी एखाद्या आगळय़ावेगळय़ा, पुरुषप्रधान क्षेत्रात गाजवलेले कर्तृत्त्व, शून्य भांडवल वा माहिती असतानाही सुरू केलेल्या व्यवसायातून पुढे अनेकींसाठी निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधी, ‘सावित्रीच्या लेकी’ घडवण्यासाठी शिक्षणाचा उभारलेला यज्ञ, विज्ञान-तंत्रज्ञानात आपल्या बौद्धिक सामर्थ्यांवर गाठलेली उंची किंवा अनेकांची मोट बांधत उभारलेले सामाजिक कल्याणकारी काम.. यातील प्रत्येक अनुभव वेगळा आणि प्रेरणादायीच. राज्यभरातून अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्त्रियांची नामांकने मागवून निवडक नऊ स्त्रियांना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’चा सन्मान प्रदान केला जातो. गेली आठ वर्षे हा उपक्रम सुरू आहे.  आलेल्या नामांकनांमधून तज्ज्ञ परीक्षक समिती नऊ दुर्गाची निवड करते. नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाणार आहे, तसेच त्यानंतर होणाऱ्या रंगतदार सोहळय़ात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गाचा सन्मान केला जाणार आहे.

माहिती प्राप्त झाल्यानंतर दुर्गाची निवड करण्याच्या काळात ‘लोकसत्ता’कडून त्याविषयी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार वा दूरध्वनी संवाद केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. पुरस्कारप्राप्त दुर्गाची माहिती ‘लोकसत्ता’मध्ये थेट २६ सप्टेंबरपासून प्रसिद्ध केली जाईल.

इंग्रजीत पाठवलेले अर्ज अपात्र ठरवले जातील. अर्जात संबंधित स्त्रीचे वेगळेपण, तिचा संघर्ष, विधायक काम आणि प्रेरणादयित्त्व याची माहिती देणे आवश्यक आहे. त्याबरोबर त्या स्त्रीचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडीही पाठवणे आवश्यक. 

काय अपेक्षित?

सामान्य नागरिकांमधील जी कर्तृत्त्ववान स्त्री ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’साठी पात्र ठरू शकेल असे आपल्याला वाटते अशा स्त्रीचे नाव सुचवून वाचक तिची माहिती पाठवू शकतात. ही माहिती ‘लोकसत्ता’कडे सुमारे ५०० शब्दांत आणि केवळ मराठीतच लिहून वा ई-मेलवर ऑपरेट करून पाठवावी.

माहिती कुठे पाठवाल?

माहिती  loksattanavdurga@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा टपालाने पुढील पत्त्यावर पाठवावी. ‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०’. ई-मेलमध्ये आणि टपालाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांवर ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’साठी असा स्पष्ट उल्लेख करावा.

हे महत्त्वाचे..

’सामाजिक कार्य, उद्योग, शिक्षण, संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरण संवर्धन वा अन्य कोणत्याही क्षेत्रातील कर्तृत्त्ववान स्त्रियांची माहिती पाठवता येईल.

’माहिती फक्त मराठीत, नोंदी स्वरूपात आणि एकदाच पाठवावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे आणि त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे.