विनायक डिगे, लोकसत्ता

मुंबई : मुलुंड-घाटकोपर आणि मानखुर्द-शिवाजी नगरदरम्यानच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वैद्याकीय उपचारासाठी महानगरपालिकेच्या घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, मुलुंडमधील सावरकर आणि एम. टी. अग्रवाल या उपनगरीय रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागते. या परिसरात विशेषोपचार रुग्णालय वा वैद्याकीय महाविद्यालय नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांना तातडीच्या उपचारासाठी खासगी रुग्णालये, शीव रुग्णालय मुंबईतील केईएम आणि जे. जे. रुग्णालयात जावे लागते. मोठे सरकारी रुग्णालय नसल्याने अनेकदा रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

मुंबईतील सर्वात मोठी कचराभूमी मानखुर्दमध्ये आहे. परिणामी, हा भाग प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. येथील नागरिकांना क्षयरोगासह श्वसन, त्वचारोगांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मानखुर्दमध्ये नागरिकांचे आरोग्य कायमच धोक्यात असते. मात्र, या भागात कोणतेही सरकारी रुग्णालय नाही. इतकेच नव्हे तर मानखुर्दलगतच्या शिवाजी नगरमध्येही पालिकेचा आपला दवाखाना वगळता अन्य कोणतीही आरोग्य सुविधा उपलब्ध नाही.

आणखी वाचा-आतापर्यंत ९४ हजार गिरणी कामगार पात्र, चार हजार कामगार अपात्र

राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्याकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्व उपनगरांमध्ये वैद्याकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी येथील नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. पूर्व उपनगरात वैद्याकीय महाविद्यालय उभारल्यास त्याचा लाभ घाटकोपर – मुलुंडदरम्यानच्या नागरिकांबरोबरच ठाण्यातील रहिवाशांनाही होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोठ्या उपचारांसाठी धाव

मानखुर्दमधील नागरिकांना सर्दी, ताप सारख्या आजारांवर ‘आपला दवाखाना’त उपचार होत असले तरी त्यांना मोठ्या आजारांवरील उपचारासाठी गोवंडीतील शताब्दी रुग्णालय किंवा शीव रुग्णालयात जावे लागते. घाटकोपरमध्ये रमाबाई, कामराज नगर, रेल्वे पोलीस वसाहतीसारख्या मोठ्या वसाहती आहेत. येथील नागरिकांना राजावाडी रुग्णालय हा एकमेव पर्याय आहे. मात्र, या रुग्णालयातही विशेषोपचार सोयी-सुविधा नसल्याने त्यांना शीव, केईएम आणि जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते.

आणखी वाचा-गारेगार प्रवासाला पसंती! वातानुकूलित लोकलचे एकाच दिवशी ३,५०० हून अधिक मासिक पास

नूतनीकरण संथगती

मानखुर्दप्रमाणे मुलुंड-भांडुप येथे कचराभूमी आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. कचराभूमी बंद करण्यासाठी येथील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत.

विक्रोळी, पवई, कांजूर मार्ग आणि भांडुप येथील नागरिकांसाठी विक्रोळी येथे असलेले महात्मा फुले रुग्णालय गेली अनेक वर्षे नूतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे.

भांडुपमध्ये रुग्णालयाचे काम संथगतीने सुरू आहे. मुलुंडमधील स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालय व एम. टी. अगरवाल रुग्णालय असल्याने उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.