‘दिवस सर्वाच्या सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा’, हे लहानपणी ऐकलेले गाणे साफ चुकीचे ठरवणारे रेल्वेचे मेगाब्लॉक आता शनिवारच्या मुळावरही उठले आहेत. मध्य रेल्वेमार्गावर सातत्याने होणाऱ्या दुर्घटनांचा आणि बिघाडांचा विचार करून या दुर्घटना टाळण्यासाठी देखभाल दुरुस्तीवर मध्य रेल्वे प्रशासन भर देत आहे. त्याचाच परिपाक म्हणून आता शनिवारीही विशेष ब्लॉक घेतले जाणार आहेत. त्यामुळे काही रद्द होणाऱ्या सेवा, दिरंगाईने चालणाऱ्या गाडय़ा आणि प्रचंड गर्दी या गोष्टी प्रवाशांना शनिवारीही सहन कराव्या लागणार आहेत. हा शनिवारी घेण्यात येणारा पहिला विशेष ब्लॉक ठाणे आणि दिवा या स्थानकांदरम्यान ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दीडशे वर्षे जुन्या रेल्वेमार्गावर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहतूक करण्यासाठी दर आठवडय़ाला रेल्वेमार्गाची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी गेली अनेक वर्षे रेल्वे रविवारी न चुकता मेगाब्लॉक घेते. मात्र गेल्या काही महिन्यांत मध्य रेल्वेवर होणाऱ्या सततच्या दुर्घटनांमुळे आणि तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेने आता रविवारपाठोपाठ शनिवारीही विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेमार्ग व्यवस्थित राहून प्रवाशांना इतर समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठीच आम्ही हा ब्लॉक घेणार आहोत. हा ब्लॉक प्रवाशांच्या फायद्यासाठीच आहे, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
*पहिला ब्लॉक येत्या शनिवारी ठाणे-कल्याण या स्थानकांदरम्यान सकाळी ९.३० ते ११.४५ या वेळेत घेण्यात येईल.
*या दरम्यान डाऊन जलद मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल.
*या दरम्यानच्या जलद गाडय़ा ठाणे ते कल्याणदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.
*मेगाब्लॉकच्या कालावधीत ९ अप आणि ९ डाऊन अशा १८ सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2014 रोजी प्रकाशित
मेगाब्लॉक आता शनिवारीही!
मध्य रेल्वेमार्गावर सातत्याने होणाऱ्या दुर्घटनांचा आणि बिघाडांचा विचार करून या दुर्घटना टाळण्यासाठी देखभाल दुरुस्तीवर मध्य रेल्वे प्रशासन भर देत आहे.
First published on: 07-11-2014 at 05:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now mega block on saturday