रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सादर करण्यात आलेला वाहनतळ शुल्कवाढीचा प्रस्ताव शुक्रवारी पालिकेतील सत्ताधारी युतीने चर्चेविनाच मंजूर केला. त्यामुळे वाहनतळाचे शुल्क आता चौपट होणार असून इमारतीबाहेर रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांनाही मासिक पासच्या माध्यमातून शुल्क भरावे लागणार आहे. आरंभी एका प्रभागात प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येणार असून नंतर संपूर्ण शहरात त्याची अंमलबजावणी होईल. कोणत्या प्रभागात प्रायोगिक प्रकल्प राबवायचा याचा निर्णय लवकरच होईल. वाहनतळ शुल्काचे हे दर दोन वर्षांनंतर दहा टक्क्यांनी वाढवण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. शहरात सुमारे १२ लाख दुचाकी असून आठ
लाख खासगी चारचाकी आहेत. पालिकेने ९२ ठिकाणी सशुल्क वाहनतळांची सोय दिली असून सर्व वाहनतळांची क्षमता १२ हजार वाहनांची आहे.
नवीन शुल्क रचनेनुसार..
*इमारतींबाहेर रस्त्यावर लावलेल्या वाहनांसाठी मासिक शुल्क आकारणी
*निवासी इमारतींबाहेरील वाहनांसाठी त्या विभागातील रात्रीच्या बारा तासांच्या शुल्काच्या एकतृतीयांश किमतीत मासिक पास
*अ, ब व क विभागासाठी अनुक्रमे १८००, १२०० व ६०० रुपयांमध्ये मासिक पास
*रहदारी आणि व्यवसायाच्या ठिकाणांनुसार तीन वेगळे दर
*रविवार, सार्वजनिक सुट्टय़ांदिवशी निम्मा दर
*वाहनतळाबाहेर ५०० मीटर परिसरात गाडी ठेवल्यास दुप्पट दर
