मुंबई : नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) ५,६०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचे अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये ठाण्यातील दोन सदनिका आणि जमिनीचा समावेश आहे.
एनएसईएल, आस्था ग्रुपच्या एका थकबाकीदाराने २०१२-१३ दरम्यान २१.७४ कोटी रुपये विहंग आस्था गृहनिर्माण प्रकल्प एलएलपीमध्ये वळवले होते. यापैकी ११.३५ कोटी रुपये सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली असलेल्या विहंग एंटरप्रायझेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला हस्तांतरित करण्यात आले. आस्था समुहाकडे एनएसईएलचे २४२.६६ कोटी रुपये देणे बाकी आहे, असे ईडीतर्फे सांगण्यात आले. आस्था ग्रुपकडून उरलेले १०.५० कोटी रुपये योगेश देशमुख नावाच्या व्यक्तीला दिले गेले होते. ही रक्कम ईडीने आधीच जप्त केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच ३,२४२.६७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य सद्यस्थितीला ३,२५४.०२ कोटी रुपये एवढे आहे, असा दावा ईडीने केला आहे.
एनएसईएलविरोधात २०१३ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. प्रकरणातील आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला, त्यांना एनएसईएलच्या व्यासपीठावर व्यापार करण्यास प्रवृत्त केले, अस्तित्त्वात नसलेल्या कंपन्यांच्या पावत्यांसारखे बनावट दस्तावेज तयार केले, खोटी खाती तयार केली आणि त्याद्वारे ५,६०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यावहार करून १३ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आतापर्यंतच्या तपासात विविध गुंतवणुकदारांकडून गोळा केलेले पैसे एनएसईएलच्या कर्जदार सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकीत कर्जाची परतफेड आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी वळवल्याचे उघड झाले आहे.
झाले काय?आर्थिक व्यवहार आणि छाननीच्या आधारावर सरनाईक यांच्या ठाणे येथील दोन सदनिका आणि जमिनीचा समावेश असलेली ११.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचेही ईडीने स्पष्ट केले आहे.