एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक संतुलनाचा कस पाहणाऱ्या मॅरेथॉनमध्ये महिला धावपटूही मोठय़ा संख्येने उतरू लागल्या आहेत. यंदा ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’मध्ये महिला धावपटूंची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी ११,८९५ महिला मॅरेथॉनमध्ये धावल्या होत्या. यंदा हा आकडा १५,८९० वर गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवघ्या तीन दिवसांवर (१९ जानेवारी) येऊन ठेपलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी स्पर्धकांची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई मॅरेथॉनचे हे १७ वे वर्ष आहे.

मॅरेथॉनमध्ये दर वर्षांगणिक धावपटूंच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा महिला धावपटूंची संख्या ११,८९५ वरून १५,८९० वाढली आहे. मॅरेथॉनमध्ये २०१९ मध्ये ४६,४१४ तर या यंदा ५५ हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत.

मुंबई वरळी सीफेस, मरीन लाइन्स आदी समुद्रकिनाऱ्यांवर स्पर्धकांचा सराव सुरू आहे. शेवटचे तीन दिवस राहिल्याने सरावासोबतच स्पर्धक आहार, व्यायाम याकडेही विशेष लक्ष देत आहेत. शरीरात पाण्याची पातळी टिकवण्यासाठी काय काय करता येतील, यावर उपाययोजना सुरू आहेत. स्पर्धकांच्या आहारात कबरेदकांचे सर्वाधिक प्रमाण असलेली कडधान्ये, फळे यांचा विशेषकरून समावेश असावा लागतो, असे स्पर्धकांना सराव, आहाराबाबत मार्गदर्शन करणाऱ्या रेश्मा शेट्टी यांनी सांगितले.

मुंबई मॅरेथॉनमध्ये मी अनेक वर्षांपासून सहभागी होत आहे. ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन तीन तासांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तीनच दिवस राहिल्याने सध्या आराम करण्यावर भर असल्याचे धावपटू बाबू यादव यांनी सांगितले. मुंबई मॅरेथॉनमध्ये ५०० स्ययंसेवक मदतीसाठी हजर असतील. वैद्यकीय सेवेसाठी एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटतर्फे २०० डॉक्टर्स, ६० रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत.

सहभागी होताना ध्यानात ठेवा

* शेवटचे चार दिवस अति व्यायाम टाळा.

*  मॅरेथॉनच्या दिवशी नवीन शूज अथवा कपडे घालणे शक्यतो टाळा.

*  धावताना अस्वस्थता, चक्कर येणे यासारखे प्रकार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*  मॅरेथॉनच्या काही दिवस आधी पुरेशी झोप घ्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of women in the mumbai marathon has increased abn
First published on: 17-01-2020 at 01:00 IST