‘टॅक्सीडर्मी’द्वारे बिबटय़ाच्या जोडीचे जतन

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जवळपास १५ वर्षे एकमेकांसोबत घालवणाऱ्या बिबटय़ांच्या जोडीला आता मृत्यूनंतरही परस्परांचा सहवास लाभणार आहे. २०१४ मध्ये मृत्यू पावलेला राजा बिबटय़ाच्या ‘टॅक्सीडर्मी’द्वारे जतन करण्यात आलेल्या मृत शरीराशेजारीच दोन दिवसांपूर्वी मरण पावलेली कृष्णा या बिबटय़ाच्या मादीचा मृतदेह जतन करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ वर्षीय मादी बिबटय़ा कृष्णा हिचा वृद्धत्वामुळे रविवारी पहाटे २ च्या सुमारास मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. कृष्णाच्या छातीत संसर्ग झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून तिच्या शरीरावर फोड आले होते. मात्र रविवारी प्रकृती अधिक खालावल्याने तिचा मृत्यू झाला. सर्वसाधारणपणे बिबटय़ाचे आयुर्मान १२ ते १४ वष्रे असते. मृत्यूसमयी कृष्णाचे वय १८ वर्षे असल्याने ती सर्वाधिक आयुष्य जगलेली मादी बिबटय़ा होती.

कृष्णाला १९९९ पासून तीन बछडय़ांसह राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. या वेळी राजा नावाचा बिबटय़ा हा तिचा पिंजऱ्यातील सहकारी होता. यामुळे पिंजऱ्यातील वास्तवात ते एकमेकांमध्ये मिसळून गेले होते; परंतु २०१४ साली राजाचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्याच्या मृतदेहाचे ‘टॅक्सीडर्मी’ प्रक्रियेद्वारे जतन करण्यात आले होते. राजाच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेली कृष्णा हिरमुसली होती. त्यामुळे तिची तब्येतही खालावली होती. अखेर रविवारी तिने अखेरचा श्वास घेतला. कृष्णाच्या स्मृती उद्यानात कायम राहाव्यात यासाठी तिच्या मृतदेहाचेही ‘टॅक्सीडर्मी’ प्रक्रियेद्वारे जतन करण्यात येणार आहे. याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनीदेखील दुजोरा दिला आहे. कृष्णाच्या मृतदेहाचे ‘टॅक्सीडर्मी’ प्रक्रियेद्वारे जतन करून तिलादेखील उद्यानात राजाच्या शेजारची जागा मिळण्याची शक्यता आहे.