रात्री जमावबंदी, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवरही बंधने; आज नवी नियमावली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : महाराष्ट्रासह देशात करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद झाले असून, राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल.

गेल्या २४ तासांत मुंबईतील ६०२ जणांसह राज्यभरात ११७९ करोनाबाधित आढळले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री करोना तज्ज्ञ गटाशी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे चर्चा केली. त्यात दिल्लीच्या धर्तीवर निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, शुक्रवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे.

याबाबत शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री पुन्हा करोना कृतीदलाशी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात येईल. या निर्बंधांनंतर आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थितीनुसार निर्बंध कठोर करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. 

दुसरीकडे, करोना रुग्णसंख्येत दुसऱ्या दिवशीही वाढ नोंदविण्यात आली. राज्यात गुरुवारी करोनाचे ११७९ रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील रुग्णवाढ  लक्षणीय आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ६०२ रुग्ण आढळले. मुंबईत बुधवारी ४९० रुग्ण आढळले होते. दैनंदिन रुग्णसंख्येतील हा दोन महिन्यांतील उच्चांक होता. गुरुवारी त्यात मोठी भर पडली. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली असली तरी राज्याच्या अन्य भागात अजून तरी तेवढी वाढ झालेली नाही. दिवसभरात पुणे जिल्हा १८४, नगर ४४, मराठवाडा २७, विदर्भ १८ नवे रुग्ण आढळले. राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या ७,८९८ रुग्ण हे उपचाराधीन आहेत.

स्थानिक पातळीवर निर्बंध?

नाताळ आणि नववर्ष कार्यक्रमांवर ओमायक्रॉनचे सावट आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना केंद्र सरकारने गुरुवारी राज्यांना केली. मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळणारी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावीत आणि करोनाबाधितांचे प्रमाण, रुग्णदुपटीचा दर यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. तसेच निवडणुका तोंडावर आलेल्या राज्यांत लसीकरण मोहिमेला वेग देण्याची सूचना केंद्राने केली.

मध्यप्रदेशमध्ये रात्रीची संचारबंदी

मध्य प्रदेश सरकारने रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ओमायक्रॉनबरोबरच करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले.

चर्चमध्ये ५० टक्के उपस्थितीची मर्यादा

करोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांनी नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करत राज्याच्या गृहविभागाने चर्चमध्ये क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत उपस्थितीला परवानगी असेल, असे गुरुवारी स्पष्ट केले. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आदी वस्तू ठेवल्या जातात. यावेळी अंतरनियमासह करोना नियमांचे पालन करावे, मिरवणूक काढू नये, गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे, मीरा-भाईंदरमध्येही शिरकाव

कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे महापालिका आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण गुरुवारी आढळला. ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे.

ओमायक्रॉनचे  २३ नवे रुग्ण

राज्यात ओमायक्रॉनचे २३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची ओमायक्रॉन रुग्णसंख्या ८८ वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांपैकी १६ हे आंतरराष्ट्रीय प्रवासी असून, सात जण हे त्यांच्या सहवासातील आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी सहाजण आखाती देश, चार जण युरोप, दक्षिण अफ्रिका आणि घाना प्रत्येकी दोन, सिंगापूर व टांझानियातून प्रवास केलेला प्रत्येकी एक जण ओमायक्रॉनबाधित आढळला आहे.

पंतप्रधानांकडून आढावा

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूच्या वेगवान प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेऊन करोनास्थितीचा आढावा घेतला. सर्व लसपात्र नागरिकांचे लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना मोदींनी राज्यांना केली. आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असे नमूद करत मोदी यांनी करोनाप्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omicron virus infection corona restrictions in the state again night curfew new rules today akp
First published on: 24-12-2021 at 02:09 IST