मुंबई : Mhada Exam Malpractice म्हाडा भरती परीक्षा गैरप्रकारप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी सातारा येथून एकाला अटक केली आहे. परीक्षेदरम्यान तो साताऱ्यातील एका परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम पाहत होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.  म्हाडाच्या भरती परीक्षेत जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या गैरप्रकारात ६० जणांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून खेरवाडी पोलिसांनी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय या परीक्षा केंद्रावरील म्हाडा परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाऱ्या अमोल तानाजी पवार (२३ वर्षे) याला नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तो चौकशीसाठी न आल्याने खेरवाडी पोलिसांनी २० ऑगस्टला त्याला साताऱ्यातील चिमणगाव, कोरेगाव येथील त्याच्या घरातून अटक केली.