सीमाशुल्क विभागाने सुमारे पावणेतीन किलो सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली विमातळावरून उत्तर प्रदेशातील रहिवाशाला अटक केली. आरोपी दुबईहून मुंबई विमानतळावर आला होता. त्याच्याविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागातील (एआययू) अधिकाऱ्यांनी आरोपी मोहम्मद नौशाद (२७) याला अटक केली. नौशाद बुधवारी विमानाने दुबईहून मुंबईला आला होता. संशयावरून त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आले. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली. झडतीमध्ये त्याच्याकडील मेणात दडवलेली भुकटीच्या स्वरुपातील एकूण दोन किलो ८४३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत एक कोटी ३८ लाख रुपये आहे. हे सोने जप्त करून नौशादला अटक करण्यात आली.

हेही वाचा >>> मुंबई : रेवस – रेड्डी सागरीमार्ग ; भूसंपादन, पुनर्वसनसाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती करणार

हे सोने आपल्या मालकीचे नसल्याची कबुली नौशादने चौकशीत दिली. त्याला तस्करी करण्यासाठी सोने देण्यात आले होते. या कामासाठी त्याला भारतात जाण्यासाठी विमानाचे मोफत तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला सोने देणाऱ्याची ओळख पटली आहे. नौशादला मुंबईत आल्यावर एक दूरध्वनी येणार होता. दूरध्वनीवरून मिळणाऱ्या सूचनेनुसार तो संबंधितास सोने देणार होता. पण त्यापूर्वीच त्याला अटक झाली.आरोपी तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीसाठी काम करीत होता. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून टोळीतील इतर साथीदारांचा अधिक तपशील गोळा करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.