डेंग्यूचा विळखा सैल होत असून हा आजार नियंत्रणात येत असल्याचे मुंबई महापालिकेचे म्हणणे असले तरी मुलुंड येथे राहणाऱ्या एका ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या महिलेला डेंग्यू असल्याचे निदान झाले होते. ४ नोव्हेंबरपासून तिला ताप आला होता. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.
या महिलेला डेंग्यू झाला होता किंवा कसे याची तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे ही महिला कर्करोगाशी झुंज देऊन मृत्यूच्या दारातून परतली होती. महापालिकेच्या नोंदीप्रमाणे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू डेंग्यूने झाला असून तीन संशयित मृत्यू झाले आहेत.