चौथी ११ जून आणि पाचवी प्रवेश यादी १४ जूनला जाहीर होणार * मुंबई विद्यापीठाअंतर्गतची पदवीची तिसरी प्रवेश यादी जाहीर

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान तिसरी प्रवेश यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली असून त्यानुसार बहुतेक महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) तीन ते चार टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसते आहे.

विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी न केल्यामुळे प्रवेश यादीत नाव येऊनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत समांतरपणे प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने पुन्हा प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी संधी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १० जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत https://mu.ac.in/admission या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे. तसेच ११ जून रोजी सकाळी ११ वाजता चौथी प्रवेश यादी आणि १४ जून रोजी दुपारी १२ वाजता पाचवी प्रवेश यादीही संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठीची तिसरी प्रवेश यादी गुरूवार, ५ जून रोजी संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आली. पारंपारिक अभ्यासक्रमांसह स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये दुसऱ्या प्रवेश यादीच्या तुलनेत तिसऱ्या प्रवेश यादीमध्ये ३ ते ४ टक्क्यांनी घट झाली आहे. तर काही महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये प्रवेश पात्रता गुणांमध्ये चढ – उतार पाहायला मिळाले. तिसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून ६ ते १० जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक

• प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी : ६ जून ते १० जून दुपारी १ वाजेपर्यंत

• चौथी प्रवेश यादी : ११ जून रोजी सकाळी ११ वाजता

• कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून प्रवेश निश्चिती : ११ जून ते १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत

• पाचवी प्रवेश यादी : १४ जून रोजी दुपारी १२ वाजता

• कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून प्रवेश निश्चिती : १४ जून ते १८ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत

तिसरी प्रवेश यादी : मुंबईतील काही महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण

• हिंदुजा महाविद्यालय, चर्नी रोड : बी. कॉम. ५५.०० टक्के, बी. कॉम. अकाउंटिंग अँड फायनान्ससाठी ८६.०० टक्के, बँकिंग अँड इन्शुरन्ससाठी ६२.१७ टक्के, फायनान्शिअल मार्केटसाठी ८६.०० टक्के, बी.ए. मल्टिमीडिया अँड मास कम्युनिकेशन वाणिज्य शाखा ७२.०० टक्के, कला शाखा ६०.५० टक्के

• रुईया महाविद्यालय, माटुंगा : बी.ए. इंग्रजी माध्यम ८४.०० टक्के, बी.ए. कम्युनिकेशन आणि मीडिया कला शाखा ८८.६ टक्के, वाणिज्य शाखा ८५.८३ टक्के, विज्ञान शाखा ७६.०० टक्के, बी.एस्स्सी. ५८.०० टक्के, बी.एस्स्सी. – बायोटेक्नॉलॉजीसाठी ८६.३३ टक्के, बी.एस्स्सी. संगणकशास्त्र ७५.१७ टक्के

• रुपारेल महाविद्यालय, माटुंगा रोड (पश्चिम) : ‘बी.ए.’ अभ्यासक्रमासाठी ७७.६६ टक्के, बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ४९.६६ टक्के, बी.एस्स्सी – संगणकशास्त्र अभ्यासक्रमासाठी ६३.०० टक्के, बी.एस्स्सी – माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी बारावीत गणित विषयात १०० पैकी ४५ गुण इतके प्रवेश पात्रता गुण आहेत. तर बी.एस्स्सी अभ्यासक्रमासाठी विषय गटानुसार सीपीएस, सीपीएम, पीएमएस, सीपीबी, सीपीझेड, सीबीझेड विषय गटासाठी पहिल्या प्रयत्नातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

• डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले : बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ४८.१७ टक्के, बी.कॉम. मॅनेजमेंट स्टडीज वाणिज्य शाखा ६६.१६ टक्के, विज्ञान शाखा ५०.१६ टक्के, बी.कॉम. अकाउंट अँड फायनान्स ८४.०० टक्के, बँकिग अँड इन्शुरन्स ६०.०० टक्के, फायनान्शिअल मार्केट ६४.०० टक्के, बी.एस्सी. माहिती तंत्रज्ञान गणित विषयात १०० पैकी ३५ गुण, बी.एस्सी. विदाशास्त्र ५०.३३ टक्के • साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले : बी.एस्स्सी. माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीत गणित विषयात १०० पैकी ४९ ते ५१ गुण, बी. कॉम. क्रीडा व्यवस्थापन ४५ टक्के, बी.कॉम. मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी वाणिज्य शाखा ६९.३ ते ७१.३२ टक्के, बी.कॉम. लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट वाणिज्य व विज्ञान शाखा ४५ टक्के, कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ५२ टक्के असतील, बी.कॉम. अकाउंटिंग अँड फायनान्स वाणिज्य शाखा ७६.५ टक्के ते ७७.८२ टक्के