मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनाच्या सोहळ्याने अवघी मुंबई दुमदुमली असतानाच वांद्रे येथे गोळीबार करून हल्लेखोराने पळ काढल्याची घटना घडली. हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर निर्मल नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली होती.
वांद्रे येथील नौपाडा परिसरात दुकानदार शमशाद सय्यद (६१) यांच्यावर अनोळखी व्यक्तीने गोळीबार केला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला.
हेही वाचा >>> मुंबई : गणेश विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू
हल्लेखोराने पाठीमागून गोळी झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. सय्यद यांना गंभीर जखम झाली असून त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोराविरूद्ध खुनाचा प्रयत्न, धमकी देऊन दुखापत करणे यासह वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर हल्लेखोराचा शोध सुरू आहे, असे निर्मल नगर पोलिसांनी सांगितले.